Headlines

पुण्यात 26 वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या:लग्न जमत नसल्याने नैराश्य; हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह




लग्न जमत नसल्याने आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात असलेल्या 26 वर्षीय तरुणाने खराडीतील एका लॉजमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय कालिदास कांबळे (रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा, हवेली) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.10 वाजता खराडीतील तुळजाभवानी नगरमधील हॉटेल गौरव रेसिडेन्सीमध्ये उघडकीस आली. स्टेट बँकेत कंत्राटी कामगार अक्षय हा कोरेगाव भीमा येथील भारतीय स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करत होता. खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने 27 ते 29 ऑक्टोबर या कालावधीसाठी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील 302 क्रमांकाची खोली बुक केली होती. 29 तारखेला चेक-आउटची वेळ संपल्यानंतरही त्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीच्या साह्याने आत प्रवेश केला असता, तो मृतावस्थेत आढळला. मित्रांना पाठवला शेवटचा मेसेज मिळालेल्या माहितीनुसार, अक्षयचे एका तरुणीवर प्रेम होते, मात्र तिने दुसऱ्याशी लग्न केल्याने आणि स्वतःचे लग्न जमत नसल्याने तो प्रचंड नैराश्यात गेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांना एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने ‘आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी’ असे लिहिले होते, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबात वाद नव्हता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयने गावठी पिस्तुलातून स्वतःच्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केली. आर्थिक विवंचना आणि लग्न न ठरत असल्याच्या चिंतेमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. मात्र, त्याच्या कुटुंबात कोणतेही वाद नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून गुन्हा दाखल या धक्कादायक घटनेप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा लक्ष्मण चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खराडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 3(25) आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 37(1)(3) सह 135 अंतर्गत गुन्हा (क्र. 380/2026) दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणांमध्ये वाढते नैराश्य चिंताजनक प्रेमभंग, आर्थिक अडचणी आणि लग्न न होणे यासारख्या कारणांमुळे तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. मानसिक तणावात असलेल्या तरुणांनी समुपदेशनाची मदत घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *