Headlines

पुण्यात 4 पिस्तुलं, 12 काडतुसे जप्त:कोथरूड पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांना केली अटक




कोथरूड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तुलं, १२ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एक ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईची सुरुवात पोलीस हवालदार शकील पठाण आणि संजय दहिभाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने झाली. त्यांना ‘कमीन्स कंपनी’च्या पाठीमागील कंपाऊंडजवळ एक तरुण कंबरेला पिस्तुल लावून संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) सुधीर घुले यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला. पोलिसांनी निशांत रमेश सातपुते (वय २२, रा. एरंडवणे) आणि संकेत प्रकाश निवंगुणे (वय २४, रा. वारजे माळवाडी) या दोघांना ताब्यात घेतले. निशांतच्या झडतीत त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्तुल आणि खिशात तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याने हे पिस्तुल संकेत निवंगुणेकडून खरेदी केल्याचे सांगितले. या माहितीवरून संकेतला अटक करून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केलेल्या आरोपी संकेत निवंगुणेकडे अधिक चौकशी केली असता, त्याचा साथीदार श्रवण पवार याच्याकडेही पिस्तुल व काडतुसे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने श्रवण पवार याला ताब्यात घेतले. त्याच्या ॲक्टिव्हा गाडीच्या डिक्कीची तपासणी केली असता, त्यात आणखी तीन गावठी पिस्तुलं आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने व सुनील कारोते, सपोनि सुधीर घुले आणि अंमलदार शकील पठाण, संजय दहिभाते, दत्तात्रय सोनवणे, श्रीकांत दुगडे, अंबादास लोखंडे, मयूर पांढरे, ऋषिकेश कोळप, ज्ञानेश्वर पांचाळ, मंगेश शेळके व वैभव शितकाल यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. पुढील तपास सपोनि सुधीर घुले करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *