Headlines

पुस्तक फाडणे म्हणजे निर्बुद्धपणाचे लक्षण:सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदीची मागणी म्हणजे मस्ती आणि नशा, विजय वडेट्टीवारांची टीका




सोनिया गांधी यांच्या पुस्तकाला विरोध करत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुस्तक फाडल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संजय निरुपम व शायना एनसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वैचारिक मुद्द्यांचे खंडन करण्याऐवजी थेट पुस्तक फाडणे हे ‘निर्बुद्धपणाचे आणि सत्तेच्या नशेतील कृत्य’ असल्याची घणाघाती टीका केली आहे. विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते खंडन करू शकता. पण ही निर्बुद्धांची मांदियाळी आहे. पुस्तक फाडणे म्हणजे निर्बुद्धपणाचे लक्षण आहे. आणि कुठे लॉयलटी दाखवत आहात तुम्ही? हा निरुपम कुठे दाखवत आहे? हा निरुपम किती दरवाजे ठोठावून बाहेर आला आहे आणि आता पुस्तक फाडताना दिसत आहे. ती शायना एनसी, बाळासाहेबांचा फोटो फाडत आहे. आणि सावरकरांच्या संदर्भात काय लिहिले असेल तर तुम्ही त्याचे खंडन करा, तुम्ही प्रेसमध्ये बोला, पुन्हा पुस्तक छापा. पण वस्तुस्थिती मांडत असताना आज देशात या पुस्तकाची सर्वाधिक विक्री होत आहे आणि लोक आवडीने घेऊन वाचत आहेत. या पुस्तकाची जगातही मागणी वाढली आहे. सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदीची मागणी म्हणजे मस्ती आणि नशा पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, या पुस्तकात वस्तुस्थिती लिहिली आहे. एक परदेशातील महिला इथे येऊन ज्या ज्या परिस्थितीला सामोरे जाऊन या देशाची नागरिक बनते आणि या देशातील अनेक संकटांना दुःखांना झेलून हा देश आपला मानून या देशात स्थिरावते आणि काम करते इथल्या लोकांसाठी, अशा महिलेप्रती, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रती फाडणे आणि कसली लॉयलटी यांची, फेकले विचार आहेत यांचे. ही मस्ती जी आहे, ही मस्ती, ही नशा उतरवायला वेळ लागणार नाही. सोनिया गांधी या जगातील प्रसिद्ध महिलांपैकी एक आहेत. अशा स्थितीत मी सावरकरांवर बोलणार नाही. सावरकर कोण होते, काय आहेत हे अनेक पुस्तकांमधून आलेले आहे, त्यावर मी बोलणार नाही. तसेच या देशात सेक्युलर विचारांचे लोक आपले विचार मांडत असतील तर त्यात गैर काय? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. बाळासाहेबांचा फोटो फाडणे हा निर्लज्जपणाचा कळस काल बाळासाहेबांचा स्मृतीदिन साजरा केला आणि आज तुम्ही त्यांचा फोटो फाडत आहात, याचे भान सुद्धा तुम्हाला नाही. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे मी मानतो, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना त्या पुस्तकाचा आशय समजला आहे त्यामुळे त्यांनी ते पुस्तक हातात घेतले आहे. हे समजण्याची आवश्यकता आहे. आणि या निर्बुद्धांकडून हीच अपेक्षा आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. संजय निरुपम यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे संजय निरुपम यांनी सोनिया गांधी यांच्यावर इटलीवरून आलेल्या बाई अशा शब्दात टीका केली होती, त्यावर पलटवार करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, निरुपमला अक्कल आहे का? नागरिकत्व स्वीकारल्याशिवाय या देशाच्या पार्लियामेंटमध्ये कोणी जाऊ शकते का? उभे राहू शकतात का? त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. 17 ठिकाणचा गोबर खाऊन आलेला आहेस तू, त्यामुळे तू अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असतोस, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी निरुपम यांच्यावर टीका केली आहे. तसेच आज सत्तेचे कवच आहे असे तुला वाटत असेल, जेव्हा सत्ता नसेल तेव्हा तुझी गती काय होईल हे येणारा काळ सांगेल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. महायुतीत अंतर्गत संघर्ष: बुडात आग लागली आहे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, असे आहे की जिल्हा परिषदेत शंभूराजेंनी मार खालल्याचा बदला घेतला. हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे जे काही बँकेत दिसले ते जिल्हा परिषदेचा वचपा होता, हे फक्त एवढेच की यांनी मारून बदला नाही घेतला, तर मतांच्या माध्यमातून घेतला. यावरून हे निश्चित आहे की महायुतीमध्ये बुडात आग लागली आहे, फक्त बुड जळायचे बाकी आहे. आग लागली आहे, तवा गरम झाला आहे, चटके बसत आहेत, फक्त जळत नाहीये, जळेल, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *