Headlines

पूरस्थितीमुळे देहू-आळंदीत गर्दी टाळा:वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे: डॉ. नीलम गोऱ्हे




आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या या ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शक्य असल्यास, वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूल, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. वॉटरहाऊस, दर्शनबारी, मोबाइल शौचालये आणि इतर आवश्यक सुविधा पुरामुळे बाधित झाल्या आहेत, ज्यामुळे भाविकांना सुविधा पुरवणे कठीण झाले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूहून ७ जुलै रोजी, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता प्रस्थान होणार आहे. आळंदीतील पालखी प्रस्थान सोहळा केवळ निमंत्रित मानकरी, मानाचे खांदेकरी, कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस अशा एकूण १,६६० जणांच्या मर्यादित उपस्थितीत होणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. डॉ. गोऱ्हे यांनी पुण्यातील संगमवाडी येथेही वारकऱ्यांनी गर्दी टाळावी, असे आवाहन केले. सध्याच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी आपत्कालीन उपाययोजना राबवल्या आहेत. महापालिकांच्या शाळांमध्ये वारकऱ्यांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, वैद्यकीय मदत, अन्नाची व्यवस्था तसेच आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आणि इतर यंत्रणा सतत कार्यरत आहेत. वारकऱ्यांनी सुरक्षित स्थळी थांबून या सुविधांचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *