![]()
पुणे महानगरपालिका संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात पारंपरिक सेवाभावाला आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी प्रशासनाची जोड दिली आहे. दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन केले आहे. या नियोजनामध्ये स्वच्छता, अखंडित पाणीपुरवठा, तात्पुरती स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, प्रकाश व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि वाहतूक समन्वयाचा समावेश आहे. यासाठी एक नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागप्रमुखांसमवेत पालखी मार्ग तसेच विविध मुक्कामस्थळांचा आढावा घेतला. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक विभागाला स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन पथके, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील अधिकारी २४ तास सज्ज ठेवण्यात आले आहेत. पालखी मार्गावर स्वच्छता, सुरक्षितता आणि तातडीची मदत उपलब्ध राहील यासाठी स्वतंत्र नियंत्रण व्यवस्था उभारण्यात आली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थेतील बदल आणि प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच पालखी सोहळा सुरक्षित, स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. त्यांनी पुणेकरांना सेवाभावाने या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करत संतांनी दिलेला समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगितले.
Source link
पुणे मनपा पालखी सोहळ्यासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुणे प्रथम – सेवावारी 2026’ उपक्रम