![]()
पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब, बेघर आणि वंचित कुटुंबांसाठी शासनाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत पैठण तालुक्यात तब्बल १८ हजार ४४४ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार विलास भुमरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती विनोद बोंबले, माजी नगराध्यक्ष भूषण कावसानकर आणि नंदू अण्णा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यात एकाच वेळी १८,४४४ घरकुले मंजूर झाल्याने वर्षानुवर्षे कच्च्या घरात अथवा भाड्याच्या निवाऱ्यात राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या हक्काच्या पक्क्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. तालुक्यातील एकही पात्र कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आमदार विलास भुमरे आणि पंचायत समितीच्या सभापती वैशालीताई विनोद बोंबले यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे. याशिवाय, १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या विशेष ग्रामसभांमध्ये उर्वरित पात्र व गरजू कुटुंबांना नवीन घरकुल मिळण्यासाठी तात्काळ ठराव मंजूर करून घ्यावेत, अशा सूचना आमदार भुमरे यांनी सर्व ग्रामसेवकांना दिल्या आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार भुमरे म्हणाले, “घरकुल ही केवळ चार भिंतींची उभारणी नसून गरीब कुटुंबांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्यासाठी दिलेला कायमस्वरूपी आधार आहे. मंजूर लाभार्थ्यांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून निधी जलद गतीने उपलब्ध करून दिला जाईल. बांधकामाला कोणताही विलंब होऊ नये, यासाठी प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवला जाईल. या प्रसंगी नामदेव खरात, दादा गलांडे, शेखर शिंदे, जालिंदर आडसुळ, मनोज गायके, जनार्दन दराडे यांच्यासह पंचायत समितीचे विविध सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन सभापती विनोद बोंबले यांनी सर्व मंजूर लाभार्थ्यांना संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. या मंजुरीमुळे तालुक्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार असून हजारो कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छत उभारले जाणार आहे. आजच्या ग्रामसभेत ठराव घेण्यात यावा १८,४४४ कुटुंबांना घरकुलाची मंजुरी मिळाल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्याबरोबरच हजारो कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे पक्के छत उभारण्यात येत आहे. तालुक्यातील राहिलेले गरीब कुटुंबाने १५ ऑगस्टला ग्रामसभा होईल त्यात ठराव घ्यावा यामुळे नवीन घरकुल आणखी घरकुल मंजूर होतील. – विलास भुमरे , आमदार, पैठण
Source link
पैठण:तालुक्यातील 18,444 गरजू लाभार्थी कुटुंबांना घरकुल केले मंजूर