![]()
शनी अमावास्येचे औचित्य साधून पैठण येथील श्री १००८ भगवान मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र येथे शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी भव्य महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
.
या धार्मिक सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी व नियोजनासाठी गुरुवारी पैठण येथील जैन मंदिरात अतिशय क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री विलास पहाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जैन परंपरेत शनि अमावास्येच्या दिवशी भगवान मुनिसुव्रतनाथांचा महामस्तकाभिषेक करण्याची प्राचीन परंपरा आहे. भगवान मुनिसुव्रतनाथ हे शनी आरिष्ट निवारक तीर्थंकर म्हणून जैन समाजात श्रद्धेने व भक्तीभावाने पूजले जातात. या विशेष व पावन दिवशी पैठणमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून जैन भाविक उत्साहाने व मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ऐतिहासिक महोत्सवाच्या आयोजनासाठी अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल, विश्वस्त प्रमोद कासलीवाल, जयकुमार बाकलीवाल, मनोज काला, प्रकाश कासलीवाल, कैलास पाटणी, किशोर भाकरे, सुमीत गंगवाल, डॉ. संजय गंगवाल, डॉ. राजेंद्र काला आणि अभिजित काला आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सकल जैन समाज परिश्रम घेत आहे.
धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा महोत्सवाच्या दिवशी सकाळी ९ वाजता विविध धार्मिक विधी व पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात येईल. यानंतर दुपारी १२ वाजता भगवान मुनिसुव्रतनाथांचा सुवर्णक्षण असलेला महामस्तकाभिषेक सोहळा होईल. परमपूज्य आचार्य श्री १०८ प्रसन्नसागरजी गुरुदेव तसेच परमपूज्य आचार्य श्री १०८ गुप्तीनंदीजी गुरुदेव यांच्या पावन आशीर्वादाने व मंगल सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे.