![]()
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या निलंबनाचे आदेश दिले. समाजमाध्यमांवर या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पोलिस हवालदार अंकुश रामा पवार आणि लक्ष्मण बालाजी रामगडे अशी आहेत. हे दोघे सहकारनगर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. १९ एप्रिल रोजी ते शारदा आर्केड चौकात वाहतूक नियमन करत असताना सिग्नल तोडून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करत होते. या कारवाईदरम्यान एका दुचाकीस्वाराने मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण केले आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले. त्यानंतर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोघांचे जबाब नोंदवले. चौकशीत असे समोर आले की, वाहतूक नियमन करणारे पोलिस कर्मचारी पवार आणि रामगडे यांनी तीन वाहनचालकांकडून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा करून घेतले होते. दंडात्मक कारवाईऐवजी स्वतःच्या खात्यात पैसे जमा करून घेतल्याचे उघडकीस आले. पवार आणि रामगडे यांचे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचा ठपका ठेवून पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा वाहतूक पोलिस घोळक्याने थांबून कारवाई करतात, असे नागरिकांकडून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी घोळक्याने कारवाई करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
Source link
पैसे उकळणारे वाहतूक पोलिस निलंबित:पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांचे कारवाईचे आदेश