![]()
‘ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी आणि आत्मविश्वास मिळाल्यास ती यशाची उंच भरारी घेतील,’ असे प्रतिपादन ‘लायब्ररी अँड पोस्टकार्ड मॅन’ म्हणून ओळखले जाणारे रूरल रिलेशनशिपचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी केले. ‘मानव्य’ संस्थेच्या २९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोखंडे म्हणाले की, ग्रामीण मुले निसर्गतःच विविध कलागुणांनी संपन्न असतात, परंतु योग्य संधी आणि आत्मविश्वास नसल्यामुळे ती मुख्य प्रवाहापासून दूर राहतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहून, सकारात्मक काम करत राहिल्यास आणि कायम संवाद साधल्यास यश निश्चित मिळते, असा सल्ला त्यांनी दिला. हा सोहळा भूगाव येथील ‘मानव्य गोकुळ’ (माताळवाडी फाटा) संस्थेच्या आवारात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे उपस्थित होते. व्यासपीठावर ‘सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे, माजी सरपंच शांताराम इंगवले, शशांक वाघ आणि उज्वला लवाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘मानव्य’ संस्थेत उभारण्यात आलेल्या नवीन सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन ‘सार्थ वेल्थ’चे संस्थापक अरविंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे संस्था ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होईल, असे परांजपे यांनी नमूद केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रदीप लोखंडे यांनी ग्रामीण शिक्षण, वाचन संस्कृती आणि डिजिटल सक्षमीकरण या विषयांवर विशेष प्रकाश टाकला. देशभरात ‘पोस्ट कार्ड आणि लायब्ररी मॅन’ म्हणून काम करताना आलेले आपले समृद्ध अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक शाळेत समृद्ध वाचनालय सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, कारण ‘आपण वाचू तरच लिहू शकू’. परांजपे यांनी पुढे सांगितले की, ‘मानव्य’ संस्थेमध्ये एक विलक्षण ऊर्जा असून ती मुलांच्या पंखात बळ देऊन त्यांना यशस्वी उड्डाणासाठी मोठे सहकार्य करत आहे. अशा सामाजिक कार्यात सहभागी होता आल्याचा आपल्याला मोठा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Source link
प्रदीप लोखंडे- ग्रामीण मुलांना आत्मविश्वास मिळाल्यास उंच भरारी घेतील:'मानव्य' संस्थेच्या 29 व्या वर्धापन दिनी 'लायब्ररी मॅन'चे प्रतिपादन