![]()
पुणे: पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. ढोले-पाटील रस्त्यावरील एका चहा विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे हे आरोपी पकडले गेले. न्यायालयाने त्यांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सिद्धराम अशोक बिदनकर (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश महावीर अगरवाल (वय ३२, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) आणि मौसम नरेंद्र मिश्रा (वय ३६, रा. लोहगाव) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास अगरवाल आणि मिश्रा हे बिदनकर यांच्या ढोले-पाटील रस्त्यावरील ‘जयमल्हार टी स्टॉल’वर आले. त्यांनी बिदनकर यांच्या आईला पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केली. बिदनकर यांच्या आईच्या निदर्शनास ही नोट बनावट असल्याचे येताच, त्यांनी तात्काळ मुलाला माहिती दिली. बिदनकर यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अगरवाल आणि मिश्रा यांना ताब्यात घेतले. बनावट नोट चलनात आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपींनी ही बनावट नोट कुठून आणली आणि त्यांनी यापूर्वी अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. बनावट नोटांची छपाई कशाप्रकारे केली जात आहे ,आरोपींनी आतापर्यंत बनावट नोटांचा वापर नेमका कुठे कुठे केला आहे, आरोपींचे अन्य साथीदार कोण आहे याबाबत सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
पुण्यात पाचशेची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न:चहा विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे दोघे अटकेत