![]()
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका ठरलेला जंगलातील सशस्त्र नक्षलवाद सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे आता संपुष्टात आला आहे. मात्र, आता विमर्शाच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करणाऱ्या ‘वैचारिक आणि शहरी माओवादा’चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे, असा सूर पुण्यात आयोजित ‘नक्षलवाद: संविधानविरोधी आव्हानाचा शेवट’ या परिसंवादात उमटला. एरंडवणे येथील सेवा भवनमध्ये हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बस्तरचे अभ्यासक व लेखक राजीव प्रसाद, महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-प्रचारप्रमुख प्रदीप जोशी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषणाचा संपादित अंश असलेल्या ‘नक्षलवाद परास्त – अमन और विकास की सौगात’ या संस्कृती प्रतिष्ठानच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. बस्तरचे रहिवासी असलेले लेखक राजीव प्रसाद यांनी सांगितले की, देशात विखंडन आणि अराजकता निर्माण करणे हाच माओवादाचा मुख्य हेतू आहे. नक्षलवाद हा कधीच सामाजिक-आर्थिक प्रश्न नव्हता, उलट त्यांच्यामुळेच हे प्रश्न निर्माण झाले. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलांची सक्तीने भरती करून त्यांना बंदूक हातात धरण्यास भाग पाडले. माओवाद्यांनी आज जंगलातील बंदूक जरी खाली ठेवली असली, तरी खोट्या विमर्शाच्या माध्यमातून ते वैचारिक क्षेत्रात आजही सक्रिय आहेत. हा खोटा विमर्श खोडून काढण्यासाठी समाजाने अधिक सजग होण्याची गरज आहे. माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी एका काळातील परिस्थितीचे वर्णन केले. ते म्हणाले, एका काळात पशुपती ते तिरुपतीपर्यंत देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती. गरिबीमुळे नक्षलवाद वाढला हे धादांत खोटे असून, नक्षलवाद्यांनीच आदिवासींना विकासापासून वंचित ठेवले. चीनचा पुरस्कार करणे आणि भारतीय संविधान नाकारणे हेच माओवाद्यांचे मुख्य काम होते. मानवाधिकाराच्या नावाखाली पोलिसांचे खच्चीकरण करण्याचेही अनेक प्रयत्न झाले. दीक्षित पुढे म्हणाले की, आता नक्षलग्रस्त भागात रस्ते, रेल्वे, इंटरनेट आणि रोजगार पोहोचत आहे. तेथे सुशासनाचा मार्ग मोकळा होत असून, योग्य जागरूकता ठेवल्यास ‘शहरी नक्षलवादा’चाही लवकरच बिमोड होईल. तसेच देशविघातक कारवाया कोणत्याही राज्यात चालू असतील, तर त्या रोखण्यासाठी केंद्रीय दलांना विशेष घटनात्मक अधिकार दिले पाहिजेत. प्रदीप जोशी यांनी भविष्यातील आव्हानांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ब्रिटिशांनी आदिवासी आणि उर्वरित समाजात भेद निर्माण करण्यासाठी ‘वेगळी ओळख’ तयार करण्याचा प्रयत्न केला. आज ‘डीप स्टेट’कडून भारतात नवनवीन प्रयोग केले जात असून देशविरोधी शत्रूची इकोसिस्टम खूप खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे केवळ सरकार सर्व काही करेल या भ्रमात न राहता सुरक्षेसाठी समाजानेही एक पाऊल पुढे टाकावे लागेल.
Source link
सशस्त्र नक्षलवाद संपला, आता वैचारिक नक्षलवादाचे आव्हान:पुण्यातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार; गृहमंत्री शहांच्या पुस्तिकेचे प्रकाशन