![]()
प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेल्या दाखल्यांसाठी सेतू केंद्रावर अर्ज केला जातो. परंतु, महिनाभरापासून सर्व्हर डाऊनची अडचण वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यात अडचणी येत आहेत. मागील वर्षी (मे २०२५ मध्ये) १.५० लाख अर्ज दाखल झाले होते. यंदा मात्र, सर्व्हर डाऊनचा अडथळा वाढल्याने अवघे १ लाख २८ हजार ४३० अर्ज दाखल होऊ शकले. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २२ हजार विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. ज्यांचे अर्ज दाखल झाले, त्यापैकी ६२८५ अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, उपजिल्हाधिकारी शारदा जाधव यांना सर्व्हर डाऊनबाबत विचारले असता, त्यांनी उद्या माहिती घेऊन सांगते, असे स्पष्ट केले. २१०० सेतू केंद्रांत महिनाभरात (मे २०२६) १ लाख २८ हजार ४३० अर्ज दाखल झाले होते. हा केवळ दाखल झालेल्या अर्जांचा आकडा आहे. अर्जांची सरासरी पाहता, एका केंद्रात महिन्यात सरासरी ६१ अर्ज अर्थात, एका दिवसाला २ किंवा ३ अर्ज करता आल्याचे स्पष्ट होते. त्यातही ६२८५ दाखले प्रलंबित आहेत. ही आकडेवारी दाखल झालेल्या अर्जांची आहे. पण सर्व्हर डाऊनमुळे ज्यांना अर्ज दाखल करता आले नाहीत, त्यांचा आकडा संकलित केला जात नाही. त्यामुळे मागील वर्षीचा (मे २०२५) दाखल अर्जांचा आकडा व यंदाचा (मे २०२६) अर्ज दाखल आकड्याची तुलना करता, सुमारे २२ हजार अर्ज कमी आहेत. शासनाकडून अकरावी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते, त्याचा पहिला राऊंड आता आटोपला आहे. दाखल नसेल तर तात्पुरता हा पर्याय ^ अकरावी प्रवेशाचा पहिला राऊंड पूर्ण झाला आहे. दुसऱ्या राऊंडची तयारी आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आम्ही पर्याय ठेवला आहे. त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट सादर केल्यानंतर उर्वरित दाखल्यांसाठी हमीपत्र स्वीकारले जाते. अथवा दाखला मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती दाखवली तरी प्रवेश दिला जात आहे. त्यात प्रामुख्याने जातीचे दाखले, डोमेसाईल, उत्पन्न आदी दाखल्यांचा समावेश आहे. – श्रीराम थोरात, माध्य. शिक्षण विभाग, जि.प.
Source link
प्रवेश प्रक्रियेचा काळ आणि सेतू केंद्रांचा खोळंबा: दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची कसरत, मे 2025 मध्ये 1.50 अर्ज, यंदा 1.28 लाख, सद्यस्थितीत 6285 दाखले प्रलंबित