![]()
सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींसोबत ओळख वाढवायची, त्यानंतर प्रेमाचे नाटक करायचे, त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या तरुणींच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढायचे आणि फरार व्हायचे. हा प्रकार डोंबिवली येथे घडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 140 पेक्षा जास्त तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून सोशल मीडियावरील फसवणुकीचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. पनवेल परिसरातील रहिवासी असलेला आदर्श म्हात्रे हा आरोपी सोशल मीडियावरून तरुणींशी मैत्री करून त्यांच्याशी जाणीवपूर्वक प्रेमसंबंध प्रस्थापित करत असे. त्यानंतर लग्नाचे आमिष व भविष्याची सुंदर स्वप्ने दाखवून तो या तरुणींचा पूर्ण विश्वास संपादन करायचा आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज काढून तो पसार होत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. 140 पेक्षा जास्त मुलींची फसवणूक पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब उघडकीस आली असून, या आरोपीने आतापर्यंत तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. यात विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला या उच्चशिक्षित असून त्या कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या आणि जबाबदारीच्या पदांवर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 11 तरुणींनी दाखवली हिम्मत या फसवणुकीच्या प्रकाराला कंटाळून आतापर्यंत 11 महिला आणि तरुणींनी धैर्याने पुढे येत पोलिसांकडे आपल्या अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी अजूनही अनेक पीडित महिला तक्रार करण्यास टाळाटाळ करत असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. नवी मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत नवी मुंबई पोलिसांनी आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केली होती. त्याच्या अटकेच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर, डोंबिवलीतील एका पीडित तरुणीने धाडस एकवटून मानपाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाईची चक्रे फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी अनोळखी ओळख, त्यातून जुळणारे प्रेमसंबंध आणि पैशांचे व्यवहार यांबाबत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, या सराईत आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
Source link
प्रेमाचे नाटक करून तब्बल 140 तरुणींना गंडा!:लाखोंचे कर्ज काढून पसार होणाऱ्या आरोपीला बेड्या, मानपाडा पोलिसांची धडक कारवाई