![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना आज मंगळवारी अखेर जामीन मंजूर झाला. वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांना गत आठवड्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. पण आज कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सुटकेचे स्वागत करत पोलिसांवर टीका केली आहे. आरोपींना सोडून निर्दोष व्यक्तीला गुन्ह्यात अडकवले की, तोंडावर आपटावेच लागते हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले, असे ते पोलिसांना उद्देशून म्हणालेत. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान पेटवले आहे. या प्रकरणी त्यांनी काही कीर्तनकारांच्या नावांची यादी घोषित केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी दाखल काही तक्रारींच्या आधारावर पोलिसांनी विकास लवांडे यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी झाली. त्यात सरकारी वकिलांनी त्यांच्या जामिनाला तीव्र विरोध केला. पण कोर्टाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला. कोर्टाने यावेळी त्यांना पुन्हा असा गुन्हा न करण्याची ताकीदही दिली आहे. विकास लवांडेंची अटक म्हणजे हुकूमशाही – रोहित पवार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सुटकेवर समाधान व्यक्त केले. तसेच पोलिसांवर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचाही आरोप केला. आज न्यायालयाने आमच्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन मंजूर केला, त्याबद्दल न्यायालयाचे आभार. आम्ही अगोदरपासून सांगत होतो की, ज्यांनी गुन्हे केले त्या गुन्हेगारांना मोकाट सोडून विकास लवांडेंसारख्या कार्यकर्त्यांना अटक करणे म्हणजे हुकूमशाही आहे. खरंतर हा निर्णय अगोदरच झाला असता, पण सरकारी वकील व पोलिसांनी न्यायालयात खोटी माहिती देऊन दिशाभूल करत वेळकाढूपणा केला, त्यामुळे विकास लवांडेंना जामीन मिळण्यास वेळ लागला. असो, प्रशांत आंबी असो की विकास लवांडेंचे प्रकरण असो, आरोपींना सोडून निर्दोष व्यक्तीला गुन्ह्यात अडकवायला गेलं की तोंडावरच आपटावं लागतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सत्यमेव जयते, असे त्यांनी म्हटले आहे. लवांडेंनी अटकेचा केला होता तीव्र शब्दांत निषेध विकास लवांडे यांनी आपल्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. तसेच पुणे पोलिस चोर सोडून संन्याशाला फाशी देत असल्याचा आरोपही केला होता. पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलिस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलिस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन, वकील, दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे, असे ते म्हणाले होते. संग्राम भंडारे यांनी केली होती शाईफेक उल्लेखनीय बाब म्हणजे कीर्तनकार संग्राम भंडारे व काही गोरक्षकांनी पंधरवड्यापूर्वी विकास लवांडेंवर शाईफेक केली होती. त्यावेळी ते आळंदी मातोबा तालुका हवेली येथील प्रवचन आटोपून घरी परत येत होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. हल्लेखोरांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही लवांडे यांनी केला होता.
Source link
विकास लवांडे यांना अखेर जामीन मंजूर:आरोपींना सोडून निर्दोषांना गुन्ह्यात अडकवले की तोंडावर आपटावेच लागते हे सिद्ध – रोहित पवार