Headlines

फडणवीसांसोबतचे फोटो दाखवून पोलिसांना 'येड्यात' काढलं:बनावट हल्ला रचणारा राणा सूर्यवंशी देश सोडून पळून जाण्याची भीती; रवींद्र धंगेकरांची ताबडतोब अटकेची मागणी




पुण्यातील वादग्रस्त व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावरील कथित बनावट गोळीबार आणि ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षा प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी गृह खात्यावर आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उभे राहून काढलेले फोटो दाखवून राणा सूर्यवंशी याने महसूल विभाग, नोंदणी विभाग आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेला ‘येड्यात’ काढले आहे. बनावट चकमक आणि हल्ल्याचा कट रचून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकणारा हा इसम आंतरराष्ट्रीय व्यवहार बघता कधीही भारताच्या हातावर तुरी देऊन देश सोडून पळून जाऊ शकतो. त्यामुळे त्याचा पासपोर्ट तत्काळ जप्त करून त्याला आजच्या आज अटक करा,” अशी आक्रमक मागणी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी या विषयावर थेट चर्चा केल्याचे सांगतानाच, धंगेकर यांनी पुण्यातील कथित ‘गुटखा किंग’ला मिळालेली ‘वाय’ सुरक्षा, तुकाराम मुंढेंच्या कारवाईला मंत्र्यांनी दिलेली स्थगिती आणि महायुतीतील वादावर रोखठोक विधाने केली. पोलिसांची नाचक्की केली; देश सोडून पळण्याआधी सूर्यवंशीला फरफटत तुरुंगात टाका! राणा सूर्यवंशी प्रकरणावरून धंगेकरांनी प्रशासनावर तोफ डागली. “हल्ला झाल्याचा बनाव करून हा माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो आणि तिथून पोलिसांना गुंगारा देऊन परस्पर गायब होतो. घटनेला 15 दिवस उलटून गेले, तरी मुख्य सूत्रधारावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही. काही आरोपी जामिनासाठी पळत आहेत आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. मी पोलीस आयुक्त आणि महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे मागणी केली आहे की, राणा सूर्यवंशी याचे आंतरराष्ट्रीय लागेबांधे आहेत. तो परदेशात पसार होण्यापूर्वी त्याचा पासपोर्ट जप्त करून त्याला आजच्या आज बेड्या ठोकाव्यात.” सुरक्षा कमी केली, पण समाधान नाही “माझ्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी सूर्यवंशीची पोलीस सुरक्षा कमी केली आहे, याबद्दल धन्यवाद; पण एवढ्याने मन समाधान झालेले नाही. महाराष्ट्र पोलिसांची जी अब्रू वेशीवर टांगली गेली आहे, ती बदनामी भरून काढायची असेल तर त्याला फरफटत नेऊन जेलमध्ये डांबले पाहिजे.” मंत्र्यांसोबतचे फोटो दाखवून खंडणी आणि दबावतंत्र? राणा सूर्यवंशी याच्या व्यावसायिक पद्धतीवर आणि त्याला मिळालेल्या व्हीआयपी संरक्षणावर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, “त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जवळचे फोटो दिसतात. हे फोटो दाखवून तो समोरच्या बिल्डरांवर, उद्योजकांवर आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणतो, खंडणी वसूल करतो. फडणवीसांशी त्याचे नेमके काय संबंध आहेत हे मला ठाऊक नाही, पण हा इसम वरिष्ठांचे नाव लावून स्वतःचे बेकायदेशीर साम्राज्य वाढवत आहे.” गुटखा माफियांना पोलीस संरक्षण? “पुणे शहरात चाललंय काय? उद्योगपती, ब्लॅक धंदेवाले आणि गुटखा चोरांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा वाटली जात आहे का? एका बड्या गुटखा किंगलाही अशाच प्रकारे सुरक्षा देण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून, मी त्याबाबत पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र देऊन पोलखोल करणार आहे.” शिवसैनिकांवर अन्याय झाल्यास मी बोलणारच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्याशी रंगलेल्या वादावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवर खुलासा करताना धंगेकर म्हणाले, “माझा नवनाथ बन यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नाही. मात्र, एक शिवसैनिक म्हणून जनतेवर किंवा शिवसैनिकांवर अन्याय होत असेल तर मी आज, उद्या आणि भविष्यातही बोलतच राहीन. मला बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.” दुष्काळग्रस्तांसाठी काम करण्याचे आदेश “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला राजकीय वाद थांबवून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. आज मुंबईत पक्षाची महत्त्वाची बैठक असून दुष्काळ निवारणाची जबाबदारी मी स्वतः निश्चित करणार आहे.” तुकाराम मुंढेंच्या कारवाईला माझा पाठिंबा पुण्यातील रांजणगाव येथील मिथेनॉल कंपनीचा परवाना एफडीए मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पूर्ववत केल्याच्या प्रकरणावर विचारले असता त्यांनी थेट भूमिका मांडली. “आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांवर आणि विषारी मिथेनॉल कंपन्यांवर छापे टाकून जे काम केले, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांनी अनेक अवैध धंद्यांवर अंकुश आणला आहे.” कायमस्वरूपी निलंबन व्हावे “संबंधित कंपनीत कोणाचे शेअर्स आहेत हा मंत्र्यांचा विषय असला, तरी जर कंपनीत मानवी जिवाशी खेळणारे गैरव्यवहार झाले असतील, तर मंत्री झिरवाळ यांनी तात्पुरती स्थगिती न देता संबंधित कंपनीचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करावा; तरच राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल,” असे रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले. ———————————————————————– हेही वाचा… भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये: मोदींना पळून जाऊ देणार नाही, त्यांच्यावर खटले चालणार, त्यांच्यासह सर्व जेलमध्ये जाणार- संजय राऊत भाजपने महाराष्ट्राची चिंता करू नये. त्यांनी जर खरोखरच महाराष्ट्राची चिंता केली असती, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडली नसती, असा जोरदार घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. चलो दिल्ली रॅलीच्या यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *