Headlines

ग्रामीण रुग्णालय लाखांदूरची आरोग्यसेवेत मोठी झेप!:अवघ्या 43 दिवसांत 100 शस्त्रक्रिया यशस्वी, ग्रामीण रुग्णांना दर्जेदार उपचारांचा दिलासा




ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय लाखांदूरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दि. 17 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2026 या अवघ्या 43 दिवसांच्या कालावधीत विविध प्रकारच्या तब्बल 100 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत रुग्णालयाने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे परिसरातील ग्रामीण रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होण्यास मदत झाली आहे. या कालावधीत हायड्रोसील, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, शरीरावरील विविध प्रकारच्या गाठी, गर्भाशयासंबंधित आजार तसेच कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय पथकाच्या समन्वयातून या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप कुमार गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्या पुढाकारातून आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाले. या यशस्वी कामगिरीत वैद्यकीय अधीक्षक तथा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ठाकरे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. सुमित मेश्राम, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोशनी राऊत (ठाकरे), डॉ. तुषार लांजेवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना मेश्राम आणि डॉ. सर्वेश पवार यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच अधिपरिचारिका गीता गजबे, सुनैना डांगे, निकिता बोरकर, शालिनी लोणारे, गजानन मुंडे, दीपक नागोसे, रवी मडावी, संकेत सोनेकर, संजय लाडे, भोजराज राऊत, मुन्ना राऊत तसेच हत्तीरोग विभागाचे कर्मचारी मेश्राम यांनीही शस्त्रक्रिया प्रक्रियेदरम्यान महत्त्वपूर्ण सहकार्य केले. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावर शस्त्रक्रियेसह दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालय लाखांदूरचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. अवघ्या 43 दिवसांत 100 शस्त्रक्रियांचा टप्पा गाठणे ही केवळ आकडेवारी नसून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवरील विश्वास अधिक दृढ करणारी कामगिरी ठरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *