![]()
पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतिक्षित मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाले असून, यामुळे आयटी हबमधील वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मोठी सुटका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित होण
.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मेट्रो लाइन 3, हिंजवडी ते शिवाजीनगर किंवा आपण न्यायालय ते माण असेही म्हणू शकतो, या मार्गिकेचे उद्घाटन झाले आहे. विशेषतः पुण्याच्या आयटी हबसाठी ही मार्गिका अतिशय महत्त्वाची होती. या सगळ्या मार्गात प्रचंड ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या मार्गिकेमुळे लोकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मार्गिकेच वैशिष्ट्य असं आहे की 23 किलोमीटरची मार्गिका याच्यावर 23 स्टेशन्स आहेत आणि विशेषतः 2017 साली जेव्हा केंद्र सरकारने पीपीपी पॉलिसी तयार केली त्यावेळी पीपीपी पॉलिसीमध्ये डीबीएफओटीच्या अंतर्गत ही पहिली लाईन मान्य करण्यात आली. जिचं काम टाटा रियल्टी आणि सिमेन्स या जेव्हीला देण्यात आलं. अनेक अडचणी याच्यामध्ये होत्या, त्या सगळ्या अडचणी दूर करत करत आज ही लाईन सुरु झालेली आहे आणि मला विश्वास आहे की पुणेकरांना या लाईनचा खूप फायदा होईल.
यामध्ये अनेक वैशिष्ट्य आहेत ज्यात जवळपास 100 पायलट, लोकल पायलट किंवा ट्रेन पायलट जे तयार केले आहेत, या सगळ्या महिला आहेत. ही पिंक लाईन आहे आणि सर्व महिला पायलट, मेट्रो पायलट याचं संचालन करणार आहेत. याचा एकूण स्टाफही 50 टक्के महिला आहेत आणि कंस्ट्रक्शनच्या दरम्यानही ज्या प्रमुख काम करणाऱ्या अनेक इंजिनिअर्सपैकी काही प्रमुख महिला होत्या. त्यामुळे एक प्रकारे महिला शक्तीनी पॉवर्ड अशा प्रकारची मेट्रो आहे. पुण्यामध्ये त्याच्यासोबत आपली जी मेट्रोची फेज टू आहे, त्यात चार मार्गिकांचं आज भूमिपूजन केलंय. यामुळे पुण्याच्या सर्व दिशांना मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे आणि एकूण या सगळ्या लाईन पूर्ण झाल्यानंतर 120 किलोमीटरचं नेटवर्क मेट्रोचं पुण्यामध्ये तयार होणार आहे. जे नेटवर्क पुरंदर एअरपोर्टपर्यंत देखील जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पीएमआर ग्रोथ सेंटरसाठी पंतप्रधानांकडून 5000 कोटी मिळणार
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की आपल्या महायुतीच्या सरकारने पुण्याचा आऊटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, एचसीएमटीआर असेल, टनेल्स असतील, अशा सगळ्यांचं एक जाळं आणि पीएमआरला त्या ठिकाणी एक विकासाचा आराखडा तयार केलाय. ज्यातलं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा पीएमआरचं क्षेत्र असेल, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन असेल, यामध्ये प्लॅन डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. पिण्याचं पाणी असेल, गटारीची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींची एकात्मिक विचार करून आणि त्याला विकासाशी जोडण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. माननीय प्रधानमंत्र्यांचे आभार आहेत की त्यांनी यामध्ये मोठी मदत केलेली आहे. पीएमआर ग्रोथ सेंटर करता देखील 5000 कोटी रुपये हे माननीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहेत आणि त्यातून पुढचं काम आम्ही करणार आहोत.
तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावरून विरोधकांनी टीका केली होती. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की ज्यांना मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायची सवय आहे, मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहायची सवय आहे, त्यांना 5000 रुपयांचं महत्त्व कळू शकत नाही. ते शेतकऱ्यांना कळतं आणि हा अग्रिम आहे, हे सगळ्यांना माहितीये, शेतकऱ्यांना आम्ही मदत करणारच आहोत. मी तर असं म्हणेन की तुम्ही यापूर्वीचा इतिहास जर काढून बघितला तर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत ही महायुतीच्या सरकारनेच केलेली आहे. यापूर्वीच्या सरकारांनी केवळ तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, तेच आता या ठिकाणी तोंड उघडून बोलतायत, पण ते काही बोलले तरी आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. मला अतिशय आनंद आहे की प्रधानमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्रातले शेतकरी अडचणीत आहेत हे लक्षात घेऊन पूर्ण मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांची मदत आणि राज्याची मदत मिळून आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार करेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रोची इंटिग्रेटेड तिकीट सिस्टिम ऑलरेडी सुरु झालेली आहे आणि ओएनडीसीच्या माध्यमातून त्याच्यावर आपल्या पीएमपीएलला देखील आपण आणलेलं आहे. अजून त्याचं इंटिग्रेशन होण्याची आवश्यकता आहे, ते इंटिग्रेशन देखील येत्या काळामध्ये आपण पूर्ण करू. मला असं वाटतं की काही काम बाकी आहे आणि हे आपण आधीच जाहीर केलेलं आहे की काही काम बाकी आहे. त्याच्यामुळे जे काम बाकी आहे ते आता आपण पूर्ण करू, ते पूर्ण केल्यानंतरच त्याच्या क्वालिटीबद्दल आपल्याला बोलता येईल. अर्धवट कामाच्या क्वालिटीवर कसं बोलता येईल? आणि खरं तर आपण बघितलं तर एक प्रकारे इतके इंजिनिअरिंग मार्व्हल याच्यामध्ये आपण क्रिएट केलेले आहेत, ही अतिशय डिफिकल्ट लाईन होती. इतक्या अडचणी या लाईनमध्ये होत्या, अक्षरशः रोज त्याच्या संदर्भात आम्हाला पाठपुरावा करावा लागायचा. मी असेन, शिंदे साहेब असतील, अजित दादा असतील, आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. आमच्या सीएम वॉररूममध्ये ही लाईन डेडिकेटेडली फॉलोअप करून एक-एक याची परवानगी ही त्या ठिकाणी आम्ही आणली. त्यामुळे अतिशय कठीण काम होतं, पण मी टाटाचं आणि सिमेन्सचं अभिनंदन करेन की त्यांनी हे काम पूर्ण केलं.
दिया मिर्झा काही भारतातल्या मोठ्या नेत्या नाहीत
मुंबई महापालिकेने दिव्या मिर्झा यांचा दिवाळीचा व्हिडिओ डिलीट केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने टीका करणाऱ्यांना फटकारले होते, असे वृत्त समोर आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, छोटीशी गोष्ट आहे हो, मला वाटत नाही उच्च न्यायालयाने फटकारलं वगैरे असेल. काही एखादं मत व्यक्त केलं असेल कारण ही केसच गेली नाही उच्च न्यायालयात, तर फटकारण्याचा काय विषय आहे? अरे डिलीट केला मुंबई महानगरपालिकेची मर्जी. कुठलंही त्या ठिकाणी हँडल चालवत असताना त्याच्यावर काय ठेवायचं आणि काय काढायचं, ज्याचं हँडल आहे हा त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते केलंय. आणि दिया मिर्झा एक चांगल्या प्रथितयश अशा अभिनेत्री असतील, पण त्या काही भारताच्या खूप मोठ्या नेत्या नाहीयेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, हा आमच्या लेव्हलचा विषय नाहीये, तुम्ही आमच्या लेव्हलचे विषय आम्हाला विचारा, छोट्या लेव्हलचे विषय विचारू नका.