Headlines

दुबईतून सायबर फसवणूक चालवणाऱ्या आरोपीला अटक:150 हून अधिक बँक खात्यांचा वापर; एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईचा संशय




दुबईतून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवल्याचा आरोप असलेल्या सुमंत उर्फ नानू रवींद्र दसरे (वय 26, रा. निगडी प्राधिकरण) याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. दुबईतून भारतात पाठवल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली आहे. तुषार अमराराम चौधरी (वय 29, रा. चिखली) आणि आदर्श संतोष वाघमारे (वय 27, रा. आकुर्डी) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून 150 हून अधिक बँक खाती मिळवून त्यांचा फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापर केल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौधरी आणि वाघमारे वेगवेगळ्या बँकांत खाती उघडून त्यांची माहिती दुबईतील दसरेला देत होते. त्या खात्यांत फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर दोघे धनादेशाद्वारे ती रोख काढत होते. त्यातून कमिशन ठेवून उरलेली रक्कम दसरेने दिलेल्या खात्यांत जमा केली जात असल्याचा आरोप आहे. तपासात दसरे दुबईत चिनी सायबर गुन्हेगारांसोबत काम करत असल्याचे समोर आले. सुरुवातीला तो सहा हजार दिरहम पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. नंतर त्याने चिनी साथीदारांसोबत भागीदारीत सायबर गुन्हे सुरू केले. फसवणुकीच्या रकमेतील 20 टक्के हिस्सा त्याला मिळत होता. या माध्यमातून त्याने एक कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दसरेविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. त्याआधारे इंटरपोलने त्याला दुबईत ताब्यात घेतले. भारतात पाठवल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन अटक केली. दसरेला 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी आणि दुबईतील कॉल सेंटरबाबत सायबर पोलिस तपास करत आहेत. ऑनलाइन गुन्ह्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *