![]()
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने 13-12 अशा अटीतटीच्या फरकाने विजय मिळवला असला तरी, अद्याप चेअरमनपदाची निवड बाकी असल्याने या निकालात नवा ट्विस्ट आला आहे. भाजप प्रणित आघाडीचे चेअरमनपद अवघ्या दोन जागांनी हुकलेले असतानाच, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारने गोकुळ दूध संघावर 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या खेळीमुळे चेअरमनपदाचे गणित बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरश: अब्रू गेली आहे. अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली. ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली नाही. आज त्यांनी गोकुळवर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे. लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. ही भूमी समतेची आहे, शाहू महाराजांची आहे. हे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना दाखवून देणे गरजेचे आहे. काल परवाच ‘लोकशाही वाचवा’ म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या. आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. तसेच कोल्हापूरकरांनो लक्षात घ्या, ही वेळ कंडका पाडायची आहे, असे आवाहनही त्यांनी कोल्हापूरकरांना केले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. ‘गोकुळ’वर शासननियुक्त 4 सदस्यांचा शासननिर्णय!:सतेज पाटील म्हणाले- साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल पायदळी तुडवला; 2029ला हे सगळं लक्षात ठेवू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठे वळण लागले आहे. गोकुळमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला बहुमत मिळालेले असतानाही, महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह थेट 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीतील संख्याबळ बदलून महायुतीचा अध्यक्ष बसवण्याची खेळी रचली गेल्याचा आरोप करत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर
Source link
'सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला':गोकुळमधील 4 शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक