![]()
आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाला आता राजकीय पाठबळ मिळताना दिसत आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील एफआयआरमध्ये नाव असलेल्या संबंधित प्राध्यापकांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी साहिलच्या कुटुंबीयांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. गेल्या २८ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या साहिलच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा राहुल गांधी यांच्यासमोर मांडली. यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. वर्षा गायकवाड यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना साहिलच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे सांगितले. मात्र, शासनाने या कुटुंबीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. साहिलसोबत जे घडले, तशी घटना भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्यासोबत घडू नये, ही कुटुंबीयांची अपेक्षा आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणात अद्याप मोकाट असलेल्या संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘१३ महिन्यांत चार आत्महत्या; आयआयटीतील वातावरणाची चौकशी व्हावी’ आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दाही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. गेल्या १३ महिन्यांत जवळपास चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत, या घटनांमागील परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. आयआयटीसारख्या नामांकित संस्थेत नेमके कशा प्रकारचे वातावरण आहे, विद्यार्थ्यांमध्ये जातीय भेदभाव केला जातो का, त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची केले जाते का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. या संदर्भात राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, त्यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतले आहे. तसेच वाकोडे आणि आंबोरे कुटुंबीयांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दर्शन सोळंकीच्या वडिलांनाही या भेटीसाठी उपस्थित राहायचे होते; मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘दीड महिना उलटूनही आरोपींना अटक नाही’; साहिलच्या कुटुंबीयांची खंत साहिलच्या नातेवाइकांनीही राहुल गांधी यांच्यासमोर आपली बाजू मांडली. साहिलवर अन्याय झाल्याचा आरोप करत, या प्रकरणातील एफआयआरमध्ये नाव असलेले प्राध्यापक शिरीष केदारे आणि सूर्यनारायण डोल्ला यांना अद्याप अटक झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेला दीड महिना उलटूनही संबंधितांवर कारवाई झालेली नाही, त्यामुळे न्यायाच्या अपेक्षेने राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे साहिलच्या नातेवाइकांनी स्पष्ट केले. गेल्या २८ दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू असूनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतले असून, कुटुंबीयांना सहकार्य करण्याचे आणि मदतीचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. साहिलच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या प्राध्यापकांना तातडीने अटक करावी, हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. नेमकं साहिल वाकोडे प्रकरण काय? आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. साहिलच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी अन्याय आणि संस्थेतील कथित जातीय भेदभावाचा आरोप केला आहे. या प्रकरणात प्राध्यापक शिरीष केदारे आणि सूर्यनारायण डोल्ला यांची नावे एफआयआरमध्ये असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, दीड महिना उलटूनही त्यांना अटक झालेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. साहिलच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि भविष्यात इतर विद्यार्थ्यांसोबत अशा घटना घडू नयेत, यासाठी कुटुंबीयांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणात न्याय मिळावा, यासाठी आता त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. ————-
हेही वाचा.. गोवा-सुरतनंतर उदयपूरच्या मेरियटमध्ये लपवलेत गोकुळचे 12 संचालक: सतेज पाटील म्हणाले- पराभूतांना ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने घुसवण्याचा गलिच्छ डाव “कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खून करणारा अध्यादेश काढला आहे. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ गोकुळवर डोळा ठेवून हा कायदा बदलण्यात आला. ज्या पराभूत उमेदवारांना साडेचार हजार मतदारांनी धुडकावून लावले, त्यांना आता ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने (बॅकडोअर एंट्री) संचालक करून मताचा अधिकार देणे ही कसली लोकशाही? हा कसलाही डेडलॉक नसून महायुतीकडून थेट लोकशाहीच डेड (Dead) करण्याचा विकृत प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा
Source link
साहिलला न्याय कधी मिळणार? 28 दिवसांपासून आझाद मैदानावर कुटुंबीयांचे उपोषण:राहुल गांधींची भेट घेत वर्षा गायकवाडांनी केली आरोपींच्या अटकेची मागणी