![]()
“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार पूर्णपणे दिशाहीन झालेले आहेत. ते कधी काय बोलतात, कोणावर आणि किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, याचा त्यांचा त्यांनाच पत्ता नसतो. लोकांच्या आंदोलनावर आयते स्वार होऊन नेता होता येत नाही. मुळात शरद पवार साहेबांचे नाव वजा केले तर रोहित पवार कोण आहेत? राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान होऊन आज केवळ 10 आमदार उरले आहेत; त्या १० पैकी एका तरी आमदाराला रोहित पवार नेते वाटतात का? आधी स्वतःच्या पक्षात स्थान निर्माण करा आणि मग राज्य-देश चालवण्याच्या गप्पा मारा,” असा घणाघाती हल्ला भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी चढवला आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या कार्यपद्धतीची खिल्ली उडवली. तसेच विरोधकांकडून संविधानावर सुरू असलेला अपप्रचार, ईव्हीएमचा (EVM) वाद, एआय (AI) डेटा सेंटर प्रकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय संस्कृतीवर त्यांनी रोखठोक भाष्य केले. आजोबांचे विचार आधी समजून घ्या; प्रसिद्धीसाठी लोंपटगिरी थांबवा! -जयकुमार गोरे रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेचा समाचार घेताना मंत्री गोरे म्हणाले, “रोहित पवारांची दिशा ना जनतेसोबत आहे, ना पवार साहेबांसोबत आहे, ना विरोधकांसोबत! ते पूर्णपणे भरकटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता केवळ 10 आमदार शिल्लक राहिले आहेत. त्या 10 आमदारांपैकी एका तरी आमदाराचा रोहित पवारांच्या विचारांवर विश्वास आहे का? कोणी त्यांना नेता मानायला तयार नाही. त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे.” डेटा सेंटर आणि पवारांचे विचार “एआय (AI) डेटा सेंटरच्या मुद्द्यावर शरद पवार साहेब म्हणतात की ‘प्रकल्प आला म्हणजे पाणी गेले असे होत नाही’. पण रोहित पवार मात्र रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. इथल्या खासदारांनी जसे वडिलांचे विचार समजून घेतले पाहिजेत, तसेच रोहितजींनीही आजोबांचे विचार काय आहेत याचा नीट अभ्यास केला पाहिजे. शरद पवार त्यांना समजावून सांगतील की एआय प्रकल्प नेमका काय आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असलेली ही राजकीय लोंपटगिरी आता त्यांनी थांबवावी.” संविधानावर विश्वास नसेल तर खासदारकीचा राजीनामा द्या! विरोधकांच्या संविधान बचाव मोर्चावर आणि आणीबाणीच्या वक्तव्यांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर जेव्हा जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते, तेव्हा तेव्हा जनआंदोलन उभे राहते. भाजपच्या मोर्चांमध्ये जनतेचा संविधानावरचा ठाम विश्वास दिसून येत आहे. विरोधक मात्र न्यायालयांवर अविश्वास दाखवून, निवडणूक आयोगावर शंका घेऊन आणि घटनात्मक संस्था बदनाम करून देशात अराजकता माजवण्याचा कट रचत आहेत.” ईव्हीएमच्या जोरावर जिंकले अन् आता बोंब “संविधानाने दिलेल्या अधिकारावर तुम्ही ३ वेळा विधानसभेच्या आणि १ वेळा लोकसभेची निवडणूक लढवली. ज्या ईव्हीएमवर निवडून येऊन तुम्ही घटनात्मक पदे मिळवली, आज पराभव समोर दिसताच त्याच ईव्हीएमवर आणि संविधानावर शंका उपस्थित करता? जर तुमचा या व्यवस्थेवर आणि संविधानावर विश्वास नसेल, तर तात्काळ आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन दाखवा,” असे थेट आव्हान गोरे यांनी दिले. मोदीजी आणि सुप्रियाताई एकत्र देश चालवणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील संभाषणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. “पंतप्रधान मोदीजींचे वक्तव्य हा एनडीएत (NDA) सहभागी होण्याचा विषय नाही. देश हा केवळ सत्ताधाऱ्यांचा नाही, तर सत्ताधारी, विरोधक आणि देशातील जनतेने हातात हात घालून देश चालवायचा असतो, ही अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून पंतप्रधान मोदींपर्यंत चालत आलेली भारतीय जनता पक्षाची सर्वसमावेशक राजकीय संस्कृती आहे. त्याच भावनेतून ते वक्तव्य केले गेले आहे.” दरम्यान, दिवा येथील माजी अध्यक्षांच्या हत्येच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी प्रशासनाचा कडक संदेश दिला. “दिवा येथील घटनेबाबत पोलिसांनी अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. कायदा आणि पोलीस आपले काम निःपक्षपातीपणे करत आहेत. आरोपी मग शिंदे सेनेचा असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा, एकाही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. ———————————————————— हेही वाचा… गोवा-सुरतनंतर उदयपूरच्या मेरियटमध्ये लपवलेत गोकुळचे 12 संचालक: सतेज पाटील म्हणाले- पराभूतांना ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने घुसवण्याचा गलिच्छ डाव “कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खून करणारा अध्यादेश काढला आहे. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ गोकुळवर डोळा ठेवून हा कायदा बदलण्यात आला. ज्या पराभूत उमेदवारांना साडेचार हजार मतदारांनी धुडकावून लावले, त्यांना आता ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने (बॅकडोअर एंट्री) संचालक करून मताचा अधिकार देणे ही कसली लोकशाही? हा कसलाही डेडलॉक नसून महायुतीकडून थेट लोकशाहीच डेड (Dead) करण्याचा विकृत प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
पवार साहेबांना वजा केलं तर रोहित पवार कोण आहेत?:पक्षात 10 आमदार उरलेत, त्यापैकी एकाला तरी हे नेते वाटतात का? जयकुमार गोरेंची सडकून टीका