कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महायुती आणि काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. गोकुळच्या निवडणुकीत जनतेने स्प
.
निसटते बहुमत विरुद्ध 4 शासननियुक्त संचालक
नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. एकूण 25 जागांपैकी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला 13 जागांवर विजय मिळाला, तर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महायुतीच्या पॅनलला 12 जागा मिळाल्या.
कॅबिनेटचा वादग्रस्त निर्णय
महायुतीला अवघ्या एका जागेचे अंतर कमी पडत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 500 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर 4 अशासकीय (राजकीय) आणि 1 शासकीय अधिकारी असे सदस्य नेमण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला.
अध्यक्षपद हिसकावण्याचा डाव
कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 4 राजकीय संचालकांना संचालक मंडळात थेट मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे महायुतीचे संख्याबळ 12 वरून थेट 16 वर पोहोचवून सतेज पाटील यांच्या हातातून गोकुळचे अध्यक्षपद हिसकावून घेण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी आखली आहे.
शिवरायांच्या शिकवणीने वेढा फोडणार
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीसमोरील अडचणी वाढल्याची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी शिवछत्रपतींचा दाखला देत विरोधकांना सुनावले. “साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या पॅनलला 13 जागांचे स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र सत्तेचा आणि कायद्याचा गैरवापर करून हा जनाधार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे.”
वेढ्यातून सुटण्याची ताकद
“इतिहास साक्ष आहे, पन्हाळगडाचा असो वा आग्य्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी संकटांचा वेढा कसा मोडून काढायचा हे आपल्या सर्वांना शिकवले आहे. मी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा शासननियुक्त संचालकांच्या खेळीला भीक घालत नाही. हा वेढा आम्ही मोडून काढू.”
अध्यक्ष निवडीची तारीख 10 नोव्हेंबर
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आता न्यायालयीन आणि प्रशासकीय पातळीवर मोठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गोकुळच्या नियमानुसार अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी किमान 14 संचालकांची उपस्थिती (कोरम) आवश्यक असते. महायुतीचे 12 संचालक बैठकीला गैरहजर राहून ही प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या 10 नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्ष निवडीची विशेष सभा आयोजित केली जाण्याची दाट शक्यता आहे.
हायकोर्टात आव्हान देण्याची तयारी
राज्य सरकारने घेतलेल्या 4 स्वीकृत सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात सतेज पाटील आणि महाविकास आघाडी उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार आहेत. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशिवाय बाहेरून नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे असंवैधानिक असल्याचा दावा न्यायालयात केला जाणार असल्याने, ही निवडणूक पुन्हा एकदा मोठ्या कायदेशीर पेचात अडकण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, सतेज पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, 10 नोव्हेंबरला गोकुळवर सतेज पाटलांचा अध्यक्ष बसणार की महायुती बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
——————————————————-
हेही वाचा…
राहुल गांधींना विषयच समजलेला नाही:पेचप्रसंग सोडवण्यासाठी शासनाचा निर्णय, गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला आता महायुती सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधींना गोकुळचा विषयच समजलेला नाही. गोकुळमध्ये मतांची चोरी झालेली नसून, पोटनियमांमुळे निर्माण झालेला पेचप्रसंग (डेडलॉक) सोडवण्यासाठी आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असा दावा हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी