Headlines

भाजपला आलेली चरबी जनता उतरवेल:गुजरात लॉबीला गोकुळ विकण्याचा डाव; ही शेतकर्‍यांशी बेईमानी- संजय राऊत




देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला मस्ती आली असून, लोकशाही न मानण्याची त्यांची भूमिका आहे. ज्या गोकुळच्या निवडणुकीत समविचारी पॅनलला बहुमत मिळाले, त्यांना डावलून पराभूत झालेल्यांच्या हातात पुन्हा गोकुळ द्यायचे आणि ते गुजरात लॉबीला विकायचे, हा सर्व डाव जर देवेंद्र फडणवीस करत असतील, तर ते महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांशी बेईमानी करत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाहीत. शेतकऱ्यांनी ज्यांचे पॅनल निवडून दिले, त्यांच्या हाती कारभार जावा, असे शेतकऱ्यांना वाटत असताना; त्यांना डावलून लोकभावना दडपून स्वतःची सत्ता यावी म्हणून सरकार 4 संचालक नेमणार, ही चरबी आली कुठून? असा सवाल राऊत यांनी केला आहे. भाजपला आलेली ही चरबी आता जनता उतरवेल. त्यांना हा शब्द आवडणार नाही, पण त्यांची चरबी वाढली आहे. ..तर तुम्ही राजकारण करायला लायक नाही संजय राऊत म्हणाले की, लोकशाही मार्गाने जर तुमचे सरकार आले म्हणता, ते बदलू देणार नाही असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी गोकुळसाठी वेगळी भूमिका का घेतली? तिथेसुद्धा लोकशाही मार्गाने ज्या पॅनलचा विजय झाला, तो तुम्हाला पचत नसेल, तर तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करायला लायक नाहीत. बहुमताचा अनादर करत पराभूत झालेल्यांना जर सत्तेत आणणार असाल, तर तुम्हाला लोक कोल्हापूरच्या रस्त्यावरच जाब विचारतील. हा आता जनतेचा लढा झाला पाहिजे. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल जर मुख्यमंत्री आणि केंद्रीय सहकारमंत्री मानत नसतील आणि संविधान आणि नियम बदलत असतील, तर ते चुकीचे आहे. तुम्ही पराभव स्वीकारला पाहिजे. शहांची वृत्ती झुंडशाहीची संजय राऊत म्हणाले की, गोकुळ वाचवण्यासाठी मविआ म्हणून सर्वांनी एकत्र यायला हवे, या मताचे आम्ही आहोत. निवडणूक झाल्यावर जनमताचा आदर करायची नाही, ही जी परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे, त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. अमित शहा तर किंमत मोजणारच आहेत, मी त्यांना पत्रसुद्धा लिहिले आहे; पण शहा यांची वृत्ती झुंडशाहीची आहे. ट्रम्प-मोदी-नेतन्याहू हे एक त्रिकूट संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प आणि मोदी यांच्यात एक साम्य आहे. ट्रम्प-मोदी-नेतन्याहू हे एक त्रिकूट आहे, ज्यांना वाटत होते की आम्ही करू तो कायदा. नेतन्याहू पराभूत झाले, ट्रम्प यांनी बहुमत गमावले आहे आणि ते आता नामधारी आहेत; आता भारतामध्येसुद्धा तसेच होणार. अमेरिका दुसऱ्या देशाच्या युद्धात का उतरला, हेच तिथल्या नागरिकांना समजले नाही. टोकाची धर्मांधता चालत नाही, हे अमेरिकेच्या जनतेने दाखवून दिले. ..तरी पवारांचा पक्ष भूलथापांना बळी पडणार नाही संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी शरद पवार आजारी असल्यामुळे फोन केला आणि सुप्रिया सुळेंचे नाव घेत संभ्रम निर्माण केला. आजारपणाच्या चौकशीतसुद्धा जे राजकारण करतात, त्यांच्याविषयी काय बोलायचे? पंतप्रधान मोदींनी कितीही फासे टाकले, तरी शरद पवारांचा पक्ष त्यांच्या भूलथापांना काही बळी पडत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *