![]()
वाढदिवस साजरा करताना केवळ शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा दुष्काळग्रस्त आणि गरजू व्यक्तींना मदत करणे, ही माणुसकीची जपणूक आणि सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या आनंदाच्या क्षणी गरजूंना मदतीचा हात दिल्यास त्यांच्या शुभेच्छाही आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून खऱ्या अर्थाने समाधान मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मोहोळ यांच्या 9 नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचारी आणि अंत्यविधी करणाऱ्या गुरुजींना आवश्यक साहित्य भेट देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वैकुंठ विद्युतदाहिनीतील काही उणीवा दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाला योग्य त्या सूचना देणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले, वैकुंठ परिवाराशी माझे गेल्या 35 वर्षांपासून नाते आहे. येथील गुरुजी आणि कर्मचाऱ्यांशी भावनिक संबंध निर्माण झाले आहेत. पुणेकरांच्या दुःखाच्या प्रसंगी हे कर्मचारी आणि गुरुजी अत्यंत महत्त्वाची सेवा बजावतात. त्यांच्या कामाचे मोल पैशांत किंवा वस्तूंत करता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन यापुढेही आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी फाउंडेशन स्वीकारेल. मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त फाउंडेशनतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये नऊ दिवस रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि अन्य सामाजिक उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती फाउंडेशनच्या विश्वस्त नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी दिली.यावेळी अथर्व मोघे, प्रशांत मोघे, अजित मोघे, मयूर वैद्य, विद्युतदाहिनीचे सुपरवायझर गोरखनाथ कांबळे, कर्मचारी श्रीनिवास कोटा, प्रतीक खर्डेकर आदी उपस्थित होते.
Source link
स्तुत्य उपक्रम:वैकुंठ विद्युतदाहिनीतील कर्मचाऱ्यांना साहित्य भेट, मुरलीधर मोहोळ म्हणाले- आनंदाच्या क्षणी गरजूंना मदतीचा हात द्या