Headlines

Satej Patil Alleges Conspiracy Behind Gokul Directors Udaipur Resort Stay


“कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खू

.

कॅबिनेट बैठकीत 500 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह 4 शासननियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. तसेच महायुतीचे 12 संचालक सहलीवर पळवल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या लपवाछपवीची पोलखोल केली.

गोवा, सुरत ते उदयपूरचे मेरियट हॉटेल; हवं तर 12 संचालकांच्या रूम नंबरची यादी देतो!

गोकुळ निवडणुकीचा निकाल लागून 15 दिवस उलटले तरी महायुतीचे 12 संचालक कोल्हापुरात न येता अज्ञातवासात असल्यावरून सतेज पाटील यांनी सडकून टीका केली. “गुवाहाटीपासून सुरतपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाही. निकाल लागल्यापासून हे 12 संचालक आधी गोव्यात होते, तिथून दोन दिवस सुरतला नेले आणि आता राजस्थानमधील उदयपूरच्या ‘मेरियट हॉटेल’मध्ये डांबून ठेवले आहेत. गरज पडली तर मी त्या संचालकांच्या हॉटेलमधील रूम नंबरची यादीच मीडियासमोर जाहीर करतो.”

सत्तेचा कसला अट्टहास?

“मुश्रीफ साहेबांनी स्वतः पत्रकार परिषदेत 2 ते 3 वेळा कबूल केले की सतेज पाटलांकडे 13 चे बहुमत आहे. मग जनतेने तुम्हाला 12 जागा देऊन विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असताना विरोधी पक्षात बसायला का कचरता? तुम्ही 12 संचालक बैठकीला उपस्थित राहा, आमचा 13 मतांचा चेअरमन होईल आणि हा कृत्रिम डेडलॉक एका मिनिटात संपेल. पण तुम्हाला साडेपाच लाख शेतकऱ्यांची चिंता नसून फक्त सत्तेची लालसा आहे.”

या षडयंत्रामागे मुश्रीफ आणि चंद्रकांतदादा!

राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या खोट्या हेतूचा पर्दाफाश करताना ते म्हणाले, “हा कायदा बदलण्यामागे मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील हे दोघेच मुख्य सूत्रधार (Instrumental) आहेत. सहकार खाते राष्ट्रवादीकडे असताना कॅबिनेटमध्ये तिन्ही पक्षांच्या एकाही मंत्र्याने यावर चकार शब्द काढला नाही. हा कायदा का आणला, याचे काय परिणाम होणार, हे कोणालाही पडलेले नाही.”

सतेज पाटील पुढे म्हणाले, “अध्यादेशात स्पष्ट ओळ लिहिली आहे की यातून साखर कारखाने वगळले जातील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका वगळल्या जातील! मग फक्त गोकुळ आणि एक-दोन संस्थांवरच हा नियम का? कारण कोल्हापूरच्या जनतेने दिलेला कौल नाकारून केवळ गोकुळवर महायुतीची सत्ता आणायची आहे. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातील काळा दिवस आहे.”

रेट्रोस्पेक्टिव्ह कायदा चुकीचा

“कोणताही नवा कायदा हा भविष्यातील निवडणुकांसाठी लागू होतो. इथे मात्र निवडणूक झाली, निकाल लागला, निकाल महायुतीच्या विरोधात गेला म्हणून पराभव पचवता न आल्याने हा कायदा पूर्वप्रभावीपणे लागू करण्याचा दुर्दैवी अट्टहास सुरू आहे.”

साडेचार हजार मतदारांनी ज्यांना नाकारलं

4 शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवर सतेज पाटलांनी थेट सवाल उपस्थित केला. “गोकुळमध्ये शौमिका महाडिक किंवा जे उमेदवार थेट निवडणुकीत पराभूत झाले, त्यांना तज्ज्ञ संचालक म्हणून मागील दाराने घुसवले जात आहे. ज्यांना मतदारांनी साडेचार हजार मतांनी नाकारले, ते तज्ज्ञ कसे होऊ शकतात? अशा पराभूतांना तज्ज्ञ ठरवणारी डिक्शनरी कोणती आहे? जर ते एवढेच तज्ज्ञ होते, तर जनतेने त्यांना तुमच्या १२ निवडून आलेल्या संचालकांसोबत का निवडून दिले नाही? “गोकुळ दूध संघात निवडून आल्यानंतर सर्वजण एकत्र काम करतात, ही आमची परंपरा होती. मात्र सत्तेसाठी दोस्तीत गद्दारी करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.”

साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार; 10 दिवसाला 100 कोटी देणारी संस्था गिळंकृत करायचीय

गोकुळ दूध संघाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्व विषद करताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आभार मानले. “गोकुळ हा अमूलनंतरचा देशातील नावाजलेला दूध संघ आहे. दररोज २० लाख लिटर दूध संकलन होते. साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचा संसार यावर चालतो आणि दर १० दिवसाला तब्बल १०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घामाचा मोबदला म्हणून बँक खात्यात दिले जातात. एवढी मोठी शेतकरी मालकीची संस्था गिळंकृत करण्याचा हा डाव आहे.”

राहुल गांधींच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद

“शेतकऱ्यांनी दिलेला जनादेश सरकार पायदळी तुडवत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः ट्वीट करून आमच्या पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्याबद्दल मी साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो.”

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना कोर्टात खेचणार

लोकशाहीतील साध्या बहुमताची आठवण करून देताना त्यांनी भाजपला फटकारले. “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार लोकसभेत केवळ एका मताने कोसळले होते. तेव्हा त्या एका मताला किंमत होती, मग आज गोकुळमध्ये आमच्या १३ व्या एका मताला किंमत का नाही? उद्या महापालिकेत, नगरपालिकेत किंवा विकास सेवा सोसायट्यांमध्ये स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार देऊन स्वतःचे महापौर आणि चेअरमन बसवण्याचे हे अत्यंत घातक षडयंत्र आहे.”

न्यायालयात आव्हान देणार

“अमुलच्या बाबतीतही असाच प्रयोग झाला होता, तेव्हा उच्च न्यायालयाने ३ संचालकांची नियुक्ती रद्दबातल ठरवली होती. जनतेने महायुतीला नाकारले, उच्च न्यायालयाने २४ तासांत २५ संचालकांना बैठकीची नोटीस काढायला सांगून महायुतीला दणका दिला; त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून हा अध्यादेश काढला आहे. आम्ही या बेकायदेशीर अध्यादेशाविरोधात न्यायालयात दाद मागू आणि या 4 जणांचा मताचा अधिकार रद्द करून सरकारला पुन्हा तोंडघशी पाडू,” असा निर्धार सतेज पाटील यांनी शेवटी व्यक्त केला.

————————————————————-

हेही वाचा…

राहुल गांधींना विषयच समजलेला नाही: पेचप्रसंग सोडवण्यासाठी शासनाचा निर्णय, गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफांचा पलटवार

कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला आता महायुती सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधींना गोकुळचा विषयच समजलेला नाही. गोकुळमध्ये मतांची चोरी झालेली नसून, पोटनियमांमुळे निर्माण झालेला पेचप्रसंग (डेडलॉक) सोडवण्यासाठी आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असा दावा हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.