![]()
ग्राहकांच्या बनावट सह्यांवरून परस्पर तब्बल ७९ लाख ९६ हजार २६ रुपयांचे १२ फिक्स डिपॉझिट आणि चेकद्वारे पैसे वळवून बँकेने ग्राहकाला आर्थिक व मानसिक त्रास दिला. या प्रकरणी स्थायी लोक अदालताने बँक ऑफ बडोदाचा हा निष्काळजीपणा ही ‘सेवा त्रुटी’ ठरवत, बँकेला ग्राहकाची संपूर्ण रक्कम ८ टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत. नेमका काय आहे प्रकार? अमर इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम व्यावसायिक फर्मने शासकीय कंत्राटांच्या सुरक्षिततेसाठी बँक ऑफ बडोदा (उस्मानपुरा शाखा) कडून तिसऱ्या पक्षाच्या नावे मुदत ठेव पावती घेतली होती. मात्र, फर्मच्या एका कर्मचाऱ्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून, भागीदारांच्या बनावट सह्या व खोटे अर्ज सादर करून १४ महिन्यांच्या काळात तब्बल १२ एफडीआर मुदतीपूर्वीच मोडून ८० लाखांचा अपहार केला. बँक अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता किंवा मूळ खातेदारांची उपस्थिती नसताना परस्पर पैसे वर्ग केले. या प्रकरणी अर्जदारातर्फे ॲड. सारिका आर. पवार यांनी बाजू मांडून बँकेची सेवा त्रुटी सिद्ध केली. बँक ऑफ बडोदाच्या वतीने ॲड. ए. आर. तांगडे यांनी काम पाहिले. स्थायी लोक अदालतीचे अध्यक्ष एन. जी. गिमेकर आणि सदस्य पी. के. डोंगरे यांनी हा निकाल दिला. असे आहेत लोकअदालतीचे आदेश या प्रकरणी स्थायी लोक अदालतीने बँकेचे दावे फेटाळत कडक ताशेरे ओढले. बँकेच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकाची झालेली छळवणूक विचारात घेऊन खालील आदेश देण्यात आले. रक्कम परत करणे : मूळ रक्कम ७९,९६,०२६ अर्जाच्या तारखेपासून ८% भविष्यातील व्याजासह ग्राहकाला देण्यात यावी. ग्राहकाला त्रासाची भरपाई : ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल बँकेने २५,०००
रुपये भरपाई द्यावी. दाव्याचा खर्च : अर्जाच्या खर्चापोटी बँकेने १०,००० रुपये द्यावेत.
Source link
बडोदा बँकेने 80 लाखांची ‘एफडी’ परस्पर काढली:8% व्याजासह रक्कम परत द्या, स्थायी लोकअदालतीचे आदेश