![]()
खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमराल्ड टॉवर परिसरात बनावट चावीचा वापर करून शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपीकडून चोरीतील ४१.०१० ग्रॅम सोन्याची लगड, दीड लाखांची रोख रक्कम, असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमराल्ड टॉवर, तुकाराम चौक येथील रहिवासी सुधीर वसंतराव धंद्रेते हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा बनावट चावीने उघडला. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फिर्यादीच्या शेजारी राहणारा विनोद रमेशराव कोहर (वय ५१) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात एपीआय निलेश देशमुख, पीएसआय माजिद पठाण, फिरोज, उमेश पराये, खुशाल नेमाडे, अभिषेक पाठक, इमरान शेख आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आरोपीने बाजारातून बनवली बनावट चावी तपासात आरोपीने फिर्यादीच्या घराचे कुलूप गुपचूप नेऊन बाजारात त्याची बनावट चावी तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी बाहेरगावी गेल्यानंतर त्याच बनावट चावीच्या साहाय्याने घर उघडून घरातील साहित्य चोरी करण्यात आली.
Source link
बनावट चावीने शेजाऱ्याच्या घरात चोरी; एकाला अटक:41.10 ग्रॅम सोने जप्त, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; शेजाऱ्यानीच केली चोरी