Headlines

जिल्ह्यातील खड्डे बुजवल्यानंतरच हेल्मेट सक्ती लागू करण्यात यावी:संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎



जिल्ह्यात सध्या हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील खड्डे बुजवल्यानंतरच हेल्मेट सक्ती लागू करा, अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले.

.

शहरातील अनेक मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. जिल्ह्याला जोडणारे रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. बहुतेक अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान, १ ऑगस्टपासून जिल्ह्यात मोटारसायकल चालवताना हेल्मेट सक्ती करण्यात आली. पोलिस अधीक्षकांनी आदेश जारी केला होता. रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू व गंभीर दुखापती कमी करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होणे हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हेल्मेटचा योग्य वापर केल्यास अशा दुखापती मोठ्या प्रमाणात टाळता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मोटारसायकल चालवताना स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आले आहे. वाहन चालवताना हेल्मेट वापरणार नाहीत अशा नागरिकांना दंड आकारण्यात येणार आहे. सध्या ई-चलान फाडण्यात येत आहेत. मात्र, रस्त्यांवरील खड्डे बुजवल्यानंतरच हेल्मेट बंधनकारक करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. निवेदन देताना महानगराध्यक्ष देवा गावंडे, ऋषभ काळे, शहर सचिव धर्मा कराळे, गोपाल खाडे, श्रीकृष्ण दोरकर, देवा अडीलकर, हर्षल इंगळे, दीपमाला दोरकर, मीना लांडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

सार्वजनिक रस्त्यावर शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रस्ते बांधले आहेत. मात्र, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम आधी प्रशासनाने करावे. त्यानंतर हेल्मेट सक्तीचा आदेश जनतेला लागू करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. हेल्मेटचे दर १००० ते २००० रुपयांपर्यंत आहेत. हा निर्णय वाहनचालकांना अन्यायकारक वाटत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आधीच आर्थिक अडचणीत असताना हेल्मेट घेणे नागरिकांना परवडणार नाही. यामुळे नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. त्यानंतर हेल्मेट सक्ती लागू करावी. हेल्मेट सक्तीच्या निर्णयावर प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

प्रशासनाने याकडे पण लक्ष द्यावे; सनातन संस्कृती महासंघ : रस्ते अपघातांमधील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. दुचाकी चालवणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, असे सनातन संस्कृती महासंघाचे म्हणणे आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण, रस्त्यांवर पार्किंग करण्यात येत असलेली वाहने, कर्णकर्कश हॉर्न असलेली वाहने, फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या मोटारसायकली, मोकाट फिरणारी जनावरे, खड्डे पडलेले रस्ते, रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या नाल्या ही प्रामुख्याने रस्ते अपघात घडण्यासाठी कारणीभूत आहेत. प्रशासनाच्या सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करून या समस्या दूर केल्यास रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. प्रशासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी सनातन संस्कृती महासंघातर्फे करण्यात आली असल्याचे महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर आणि मिलिंद गायकवाड यांनी कळवले आहे.

वाहतूक शाखेकडून सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर मोहीम राबवण्यास प्रारंभ झाला. १०० पेक्षा अधिक विना हेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांन ा दंड आकारण्यात आला. दररोज शासकीय कार्यालयांसमोर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, इतर शासकीय कार्यालयांच्या मुख्यद्वारावर मोटारसायकलवर विना हेल्मेट प्रवेश मिळणार नाही, असे फलक लावण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *