![]()
बालविवाह रोखण्यासाठी सहसा समाजसेवक किंवा जागरूक नागरिक पुढे येतात. मात्र, शहरातील एका नाट्यमय घटनेत चक्क जन्मदात्या बापानेच ‘चाइल्डलाइन’आणि पोलिसांना फोन करून स्वतःच्या अल्पवयीन लेकीचा विवाह उधळून लावला. बापाने हे पाऊल समाजप्रबोधनातून नव्हे, तर लग्नाच्या कपड्यांच्या खरेदीला (बस्त्याला) आपल्याला न नेल्याच्या रागातून आणि दारूच्या नशेत उचलल्याचे समोर आले आहे. संबंधित कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई धुणी-भांडी करते, तर वडील कंपनीत कामगार असून दारूच्या प्रचंड आहारी गेलेले आहेत. ज्या मुलीचा विवाह निश्चित झाला होता, तिचे शिक्षण केवळ आठवीपर्यंतच झाले आहे. मात्र, त्याच परिसरात राहणारा आणि सेंट्रिंगचे काम करणारा तरुण कमावता असल्याने, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने या अल्पवयीन मुलीचा विवाह निश्चित करण्यात आला होता. पथकाने दोन्ही कुटुंबांना दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा माहिती मिळताच पोलिस आणि चाइल्डलाइनच्या पथकाने तत्काळ विवाहस्थळी धाव घेतली. नवरी मुलीची चौकशी केली असता ती केवळ आठवी पास आणि अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ऐन वेळी हा विवाह थांबवला आणि दोन्ही कुटुंबांना कायदेशीर कारवाईचा कडक इशारा देऊन समज दिली. वडील दुकानात गोंधळ घालतील म्हणून कुटुंबीयांनी नेणे टाळले लग्नाची तयारी सुरू असताना, वडील व्यसनी असल्याने ते दुकानात गोंधळ घालतील या भीतीने त्यांना डावलून इतर नातेवाइकांनी बस्ता आणला. ही बाब वडिलांच्या चांगलीच जिव्हारी लागली. लग्नाच्या दिवशी सकाळी ७ वाजता हळदीचा कार्यक्रम पार पडला व काही वेळातच लग्नसोहळा सुरू होणार होता. मात्र, बस्त्याला न नेल्याचा राग मनात खदखदत असलेल्या वडिलांनी सकाळीच दारू ढोसली आणि थेट पोलिसांना व चाइल्डलाइनला फोन करून बालविवाह सुरू असल्याची माहिती दिली.
Source link
बस्त्याला न नेल्याच्या रागातून बापाने लावला चाइल्डलाइनला फोन:पोलिसांनी थेट मांडवात धाव घेऊन रोखला बालविवाह