![]()
शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असताना, आता थेट खासदार संदिपान भुमरे यांच्या रामकृष्णनगर येथील बंगल्यातच चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री बंगल्याच्या मुख्य गेटवरून आत उडी मारत या दोन चोरट्यांनी खासदारांच्याच सुरक्षा रक्षकाचा मोबाइल लांबवला. थेट खासदारांच्या बंगल्यातच चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली असून पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सुरक्षा रक्षक श्रीराम कांताराम बोकण (४५, मूळ रा. मठ पिंपळगाव, ता. अंबड, जि. जालना) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. श्रीराम बोकण हे खासदार संदिपान भुमरे यांच्या बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून तैनात आहेत. शनिवारी (३० मे) रात्री ११.३० च्या सुमारास जेवण आटोपून श्रीराम आणि त्यांच्या पत्नी मंदा हे बंगल्याच्या अंगणात आराम करत होते. या वेळी श्रीराम यांनी त्यांचा १० हजारांचा मोबाइल बाजूलाच चार्जिंगला लावला होता.रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास श्रीराम यांना जाग आली, तेव्हा चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २ अज्ञातांनी मुख्य गेटवरून बंगल्याच्या आत उडी मारल्याचे आणि चार्जिंगला लावलेला मोबाइल हातोहात पळवून नेल्याचे स्पष्टपणे कैद झाले आहे.
Source link
खासदार संदिपान भुमरे यांच्या बंगल्यात चोरी; रक्षकाचा मोबाइल केला लंपास:मध्यरात्री गेटवरून मारली उडी; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू