Headlines

बहिणीकडून राखीऐवजी अंत्यसंस्काराची भावांवर दुर्दैवी वेळ!:पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणावर वडेट्टीवार आक्रमक, मारेकऱ्यांना फाशीची मागणी




वाकड येथील 42 वर्षीय विवाहित शिल्पा सचिन गवारे यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. शिल्पा गवारे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, आरोपींना जामीन देऊ नये आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. दोन निष्पाप मुलांची आई असलेल्या शिल्पा गवारे यांचा संपत्तीच्या हव्यासापोटी अमानुष छळ करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही आत्महत्या नसून हत्या- वडेट्टीवार वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील वाकड येथे शिल्पा गवारे यांचा संपत्तीच्या हव्यासापोटी अमानुष छळ करण्यात आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा आपला ठाम आरोप असल्याचे त्यांनी म्हटले. महिलांवर पितृसत्ताक व्यवस्थेमुळे होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात उपस्थित केला होता. शिल्पा गवारे यांच्या प्रकरणातून महिलांवरील अशा अत्याचाराचे जळजळीत उदाहरण समोर येते, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. जन्मठेपेची शिक्षा भोगलेला पती बाहेर आला आणि पुन्हा महिलेचा बळी? या प्रकरणात वडेट्टीवार यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. शिल्पा गवारे यांचे पती सचिन गवारे यांच्यावर पूर्वी खूनाचा गुन्हा दाखल होता आणि त्या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांनी सुमारे चार वर्षे कारागृहात शिक्षा भोगल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अशा व्यक्तीच्या बाहेर आल्यानंतर एका निष्पाप महिलेचा क्रूरपणे बळी गेला, ही बाब कायद्याच्या अंमलबजावणीतील गंभीर निष्काळजीपणा दाखवते, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या संपूर्ण पार्श्वभूमीची तपास यंत्रणांनी गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. राखी बांधण्याऐवजी भावांवर अंत्यसंस्काराची वेळ रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी या घटनेचे भावनिक चित्रही मांडले. संपूर्ण देशात बहिणीच्या रक्षणाचा सण साजरा होत असताना शिल्पा गवारे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता, असा आरोप त्यांनी केला. बहिणीकडून राखी बांधून घेण्याऐवजी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या भावांवर आली, ही बाब समाजमन हेलावून टाकणारी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. माहेरच्या मालमत्तेसाठी छळ केल्याचा आरोप दरम्यान, या प्रकरणात शिल्पा गवारे यांच्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सासू, सासरे आणि दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, शिल्पा गवारे यांचा विवाह २००९ मध्ये सचिन गवारे यांच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी सचिन यांच्यावर पूर्ववैमनस्यातून झालेल्या खूनाच्या प्रकरणात खटला सुरू असल्याची माहिती सासरच्या मंडळींनी लपवून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. लग्नानंतर काही काळ संसार सुरळीत होता. मात्र त्यानंतर शिल्पा यांच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच त्यांच्या वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘मालमत्तेत हिस्सा दे’; धमकी आणि मारहाणीचा आरोप तक्रारीनुसार, शिल्पा यांच्या पतीला दारूचे व्यसन होते. तसेच सासू त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन सचिन यांचे कान भरत असल्याचा आरोप आहे. त्यातून पतीकडून शिल्पा यांना मारहाण केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ‘तुझ्या वडिलांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करू नकोस आणि आम्हाला मालमत्तेत हिस्सा दे,’ अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. बहिणीचा संसार टिकवण्यासाठी तिच्या भावाने वेळोवेळी सासरच्या मंडळींच्या आर्थिक मागण्या पूर्ण केल्या. रोख रक्कम देण्याबरोबरच व्यवसाय आणि प्लॉट खरेदीसाठीही आर्थिक मदत केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र शिल्पा यांनी काही दिवसांपूर्वी मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचे सासरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांचा पुन्हा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. मध्यरात्री गळफास घेतल्याची माहिती; बेडरूमचा दरवाजा उघडा असल्याने संशय गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास शिल्पा यांनी बेडरूममधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या माहेरच्या मंडळींना देण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर शिल्पा यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास घेतल्याचे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात येत असल्याने या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करत आहेत. आत्महत्या की अन्य काही प्रकार, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सर्व दोषींवर कठोर कारवाईची वडेट्टीवारांची मागणी या प्रकरणाची शासन आणि पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शिल्पा गवारे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, आरोपींना जामीन मिळू नये आणि त्यांची कसून चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषी सिद्ध झालेल्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी या प्रकरणाला ‘हत्या’ म्हटले असले तरी पोलिसांच्या तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तक्रारीतील आरोप, कुटुंबीयांनी व्यक्त केलेला संशय आणि उपलब्ध पुरावे या सर्व बाबी तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत. हेही वाचा… तू कुठूनतरी येशील आणि राखी बांधून घेशील…:रक्षाबंधनाला अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भावुक, रोहित पवार म्हणाले- हजारो बहिणी कुणाला राखी बांधणार? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यावर्षी २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाला आज बरोबर ७ महिने पूर्ण होत आहेत. आज देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र आपल्या लाडक्या भावाची, ‘अजितदादा’ची आठवण आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *