Headlines

बार्शीतील युवांच्या कलाविष्काराचा कोण ठरणार जेता?:चार दिवसांपासून सुरू असलेल्या युवा महोत्सवात आज शोभायात्रा, पारितोषिक वितरणाने समारोप‎


.

युवा महोत्सव नगरीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या युवा महोत्सवाची सांगता आज बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात होत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात तब्बल ५५ महाविद्यालयांतील सुमारे १००० कलावंतांनी विविध कलाप्रकारांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. आता या महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद कोण पटकावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महोत्सवात एकूण ३९ कलाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. दररोज सरासरी १३ कलाप्रकारांचे सादरीकरण झाले. सांघिक तसेच वैयक्तिक अशा दोन्ही स्वरूपातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलेचा ठसा उमटवला. शिवाजी महाविद्यालयासाठी यंदाचा महोत्सव विशेष महत्त्वाचा आहे. आतापर्यंत झालेल्या २१ युवा महोत्सवांपैकी तब्बल १६ वेळा शिवाजी महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले असून, चार वेळा उपविजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे यंदाही महाविद्यालय चॅम्पियन ट्रॉफी कायम राखणार की नव्या महाविद्यालयाच्या नावावर विजेतेपदाची नोंद होणार? याची उत्सुकता आहे. गुरुवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंचावर युवा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. त्यामुळे अंतिम निकालाकडे सहभागी महाविद्यालयांसह विद्यार्थी, शिक्षक आणि कला रसिकांचे लक्ष लागले आहे. युवा महोत्सवातील स्पर्धांचा उत्साह अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. दररोज सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास सुरू होणाऱ्या स्पर्धा काही मंचांवर रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू होत्या. विशेषतः एकांकिका स्पर्धेला सर्वाधिक वेळ लागला. एकांकिका स्पर्धेत १३ संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला असला, तरी रंगमंचावरील तयारी, नेपथ्य आणि इतर व्यवस्थेसाठी आणखी अर्धा ते पाऊण तास लागत होता. मुख्य रंगमंचावर इतरही कलाप्रकारांचे सादरीकरण असल्याने एकांकिका स्पर्धा दोन दिवसांत विभागण्यात आली. रात्री सुमारे ९ वाजता सुरू झालेल्या एकांकिका स्पर्धा दोन्ही दिवस पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू राहिला. त्यामुळे युवा महोत्सवातील कलावंतांचा उत्साह, मेहनत आणि कलेप्रती असलेली निष्ठा या स्पर्धेत प्रकर्षाने दिसून आली. ‘चला हवा येवू द्या’ फेम श्रेया बुगडे या समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परितोषक वितरण होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *