![]()
प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी बालगंधर्वांनी आपल्या आई-वडिलांना भेट दिलेला 100 वर्षांपूर्वीचा तानपुरा गोपाळ गायन समाज संस्थेला भेट दिला. गोपाळ गायन समाज संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या निमित्ताने आयोजित उत्सवात परांजपे कुटुंबियांनी हा ऐतिहासिक ठेवा संस्थेकडे सुपूर्द केला. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात हा भेट समारंभ पार पडला. यावेळी गोपाळ गायन समाजाचे डॉ. विकास कशाळकर, सुरेश साखोळकर, विजयकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या गोपाळ गायन समाज संस्थेकडून या ऐतिहासिक तानपुऱ्याचे जतन केले जाणार आहे. डॉ. रामचंद्र परांजपे यांच्या मातोश्री कै. कमलाबाई परांजपे या गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे संगीत शिकल्या होत्या. प्रत्येक गोकुळाष्टमीला उत्सवात त्यांचे गायन होत असे. सन 1921 मध्ये मुंबईत संयुक्त मानापमानचा प्रयोग होता, त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना भेट दिला होता. बालगंधर्व पुण्यात आले की कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे उतरत असत आणि त्यांना नाट्यपदे शिकवत असत. त्यावेळी केशवरावांनी दिलेला हा तानपुरा बालगंधर्वांनी कै. बापूसाहेब व कमलाबाई परांजपे यांच्याकडे दिला होता. हाच ऐतिहासिक ठेवा त्यांचे सुपुत्र डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी आजवर जतन केला होता. शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली असली तरी, आजही तो तानपुरा देखणा आणि उत्तम स्थितीत आहे. गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाचा प्रारंभ कै. कमलाबाई परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘रंगबहार’ या नाटयगीतांच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी सूरगंधर्व सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी व संजय गोगटे (ऑर्गन) आणि केदार कुलकर्णी (तबला) यांनी सादरीकरण केले. निरंजन कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
Source link
बालगंधर्वांचा तानपुरा 'गोपाळ गायन समाजा'ला भेट:परांजपे कुटुंबियांचा पुढाकार, संगीताच्या अमूल्य ठेव्याचे जतन