![]()
प्रतिनिधी | बोरदहेगाव रविवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यात बोरदहेगाव परिसरात वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. परिसरातील गावांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. काही ठिकाणी वीज पडून पशुधन दगावले. बहुतांश गावांत विद्युत पोल आडवे पडले. विद्युत तारा तुटल्या. रविवारी सायंकाळी ६ वाजता तुफान वारा व पाऊस झाला. शिवराई, परसोडा, बेंदवाडी, गोळवाडी, बोरदहेगाव, राहेगव्हाण, कारंजगाव, पालखेड या गावांत महावितरणचे मोठ्या प्रमाणावर पोल पडले. तारा तुटल्या. शिवराई ३३ केव्हीवरील सर्व गावांची वीज गेली. वीज जाऊन २२ तास उलटले तरी पुरवठा पूर्ववत झाला नाही. सोमवारी सकाळपासून महावितरणचे कर्मचारी व वायरमनची टीम युद्धपातळीवर काम करत आहे. तरीही यश आलेले नाही. मान्सूनपूर्व कामे वेळेत झाली असती तर ही वेळ आली नसती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विद्युत तारांना व पोलांना अडथळा ठरणारी झाडे-झुडपे काढली असती, मेंटेनन्स पूर्ण केले असते, अशीही नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर वादळी वाऱ्याने आडवे पडलेले झाड दुसऱ्या दिवशीही जागेवरच होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ते हटवलेले नाही. वाहतुकीला अडचण होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. रविवारी संध्याकाळी मोठी झाडे आडवी पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती.
Source link
बोरदहेगाव परिसरात पडला अवकाळी पाऊस:वादळानंतर २२ तास वीज होती गायब, झाडही हटेना