![]()
शनिवार आणि रविवारची जोडून आलेली सुट्टी, त्यात पावसाळी वातावरण आणि निसर्गाचे खुललेले रूप यामुळे पर्यटकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात रविवारी पर्यटकांची झुंबड उडाली. भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी) यांसह विविध पर्यटनस्थळांवर सुमारे १५ ते २० हजार पर्यटकांनी हजेरी लावली. रंधा परिसरात पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत होती. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते. पावसामुळे परिसरातील धबधबे, हिरवाई आणि धरण परिसराचे सौंदर्य खुलल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, गर्दीमुळे काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. रंधा परिसरातील धबधब्यांजवळ काही अतिउत्साही पर्यटकांनी धोका पत्करत जाण्याचा प्रयत्न केला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस कर्मचारी अशा पर्यटकांना धोकादायक ठिकाणांपासून दूर करताना दिसत होते. कायदा व सुव्यवस्था तसेच पर्यटकांची सुरक्षितता यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. जोडून सुट्टी असल्याने वाहतूक कोंडी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गात बदल केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांच्या आदेशानुसार भंडारदरा परिसरात सुमारे २० ते २५ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक परसराम तागड यांच्यासह पोलिस कर्मचारी दिवसभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. कळसुबाई परिसरात काही पर्यटकांचे मोबाईल हरवले होते. वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे मोबाईल चेक पोस्टवर मिळून आले आणि संबंधित पर्यटकांना परत करण्यात आले. वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र पाटील, शंकर लांडे, तळपाडे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवला होता. भंडारदऱ्यात काय पाहाल? भंडारदरा धरण – पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धरण आणि निसर्गरम्य परिसर. .रंधा धबधबा – प्रवरा नदीवरील भव्य धबधबा; पावसाळ्यात रौद्र रूप. .कळसुबाई शिखर – महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, ट्रेकर्सचे आकर्षण. .हरिश्चंद्रगड-कोकणकडा – सह्याद्रीचे विहंगम दृश्य आणि पर्यटनाचा अनुभव. .अमृतेश्वर मंदिर – रतनवाडीतील प्राचीन स्थापत्याचा सुंदर नमुना. .पावसाळी खासियत – हिरवाई, धुके, धबधबे आणि डोंगररांगा यामुळे भंडारदरा पावसाळी पर्यटनाचे प्रमुख केंद्र ठरते. रंधा फाट्यावरून भंडारदरा येथे जाणारा प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. शेंडी व भंडारदरा परिसरात जाण्यासाठी वाकी फाटा आणि वारंघुशी फाट्यावरून प्रवेश देण्यात आला. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वारंघुशी–वाकी–चिचोंड ी– यश रिसॉर्ट–शेंडी– धरण स्पिल्वे गेट–भंडारदरा गाव–गुहीरे–रंधा असा एकेरी वाहतुकीचा मार्ग करण्यात आला होता. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. भंडारदऱ्यासोबतच कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगडावरही पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.
Source link
भंडारदरा ‘फुल्ल’; रंधा, कळसुबाई अन् हरिश्चंद्रगड पर्यटकांनी गजबजले:जोडून आलेल्या सुट्यांमुळेसुमारे 15 ते 20 हजार पर्यटकांची हजेरी