![]()
शिवाजी पार्कवर पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली होती. संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तुलना थेट गुंड लॉरेन्स बिश्नोईशी केली होती, तर उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप केला होता. या सर्व आरोपांना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि आमदार चित्रा वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘अमित शाहांवर बोलण्याची तुमची औकात तरी आहे का?’ खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना चित्रा वाघ म्हणाल्या की, “ज्यांना भांडुपमध्ये स्वतःचा एक साधा नगरसेवक निवडून आणायची धमक नाही, त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याचे धाडस करू नये. सकाळी उठून माईकसमोर पोपटपंची करणाऱ्या सर्वज्ञानी संजय राऊतांनी आधी आपली राजकीय पातळी तपासावी. काश्मीरमधून कलम ३७० कायमचे हटवून अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न साकार करणाऱ्या अमित शाहांवर बोलण्याची तुमची औकात तरी आहे का?” राम मंदिराच्या मुहूर्तावर राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना वाघ म्हणाल्या, “राम मंदिराचा मुहूर्त योग्यच होता. खरा मुहूर्त तर तुमचा २०१९ मध्ये चुकला होता, जेव्हा तुम्ही जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पायाशी जाऊन बसलात.” ‘पराभवाची पायघडी आत्तापासूनच घालू नका’ उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीबाबत केलेल्या आरोपांचाही चित्रा वाघ यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मतदार यादीत गडबड असल्याचा बनाव रचून राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने व्होट बँक बनवून सत्ता मिळवण्याचे तुमचे स्वप्न महाराष्ट्राची जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. इथे घुसखोरांना थारा नाही. त्यामुळे मतदार याद्यांवर खोटे आरोप करून पराभवाची पायघडी आत्तापासूनच घालू नका.” ‘व्हिएतनाम मॉडेलवर महाराष्ट्रात सत्ता मिळत नसते’ उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना वाघ पुढे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे साहेब, तुम्हाला स्वतःचा पक्ष आणि स्वतःचे आमदार सांभाळता आले नाहीत आणि तुम्ही सत्तांतराच्या मोठ्या गप्पा मारत आहात. राहुल गांधींच्या ‘व्हिएतनाम मॉडेल’वर महाराष्ट्रात कधीही सत्ता मिळत नसते हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राची सुजाण जनता तुम्हाला पुन्हा एकदा तुमची जागा दाखवून देईल.”
—————- हेही वाचा..
Source link
भांडुपमध्ये नगरसेवक निवडून आणायची धमक नाही:त्यांनी अमित शहा-मोदींवर बोलू नये; चित्रा वाघ यांचा राऊत-ठाकरेंवर पलटवार