![]()
शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत कदम यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून व व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, पडद्याआड राहून जरांगे यांना ताकद देणारे आणखी कोण होते, देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर सोडायला, त्यांना बदनाम करायला कोण कोण होते हे सुद्धा समोर येईल. मला असे वाटते की एखाद्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी किंवा आपल्या मुलाचे मंत्रिपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी प्रमोशन मिळवण्यासाठी असे बोलत असाल तर काही हरकत नाही. पण भारतीय जनता पक्षाला दोष देणार असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही जसे कडक आक्रमक बोलतात, वागतात तसेच आम्हालाही बोलता येते आणि वागता येते, असा इशारा दरेकर यांनी रामदास कदम यांना दिला आहे. आपण सभ्यता सुसंस्कृतपणा राखला पाहिजे रामदास कदम यांनी भाजपमधल्या नेत्याने एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा उचलला आहे, असा दावा केला आहे. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. तुम्ही आक्रमक बेधडक बोलणारे नेते आहात न, मग सांगावे त्यांनी की आमच्या पक्षाच्या नेत्याने विडा उचलला आहे. त्या ठिकाणी आपण सांगता की मराठा समाजाच्या नेत्याला संपवण्याचे षड्यंत्र भाजपला हाताशी धरून करत आहात. आम्ही बोलायचे का? देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण कोण ताकद देत होते ते? त्यामुळे मला असे वाटते की आपण एका घरात राहतो, एका घरात नांदतो तर आपण सभ्यता सुसंस्कृतपणा राखला पाहिजे. देवेंद्रजींवर आरोप होत होते ते षड्यंत्र होते का? पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर कटकरस्थान झाले, त्यांच्यावर आरोप झाले, त्याचे स्वागत आहे का? आता त्या ठिकाणी आपल्या नेत्यावर टीका झाल्यावर बोलणे स्वाभाविक आहे, तुम्ही बोला, आम्ही सांगतो की त्याची चौकशी झाली पाहिजे. जे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु, भाजप जबाबदार आहे, भाजप षड्यंत्र करत आहे, मग त्यावेळी देवेंद्रजींवर आरोप होत होते ते षड्यंत्र होते का? त्याच्या मागे कोण कोण होते? त्याची पण चौकशी होईल, त्याच्या चौकशीची आम्ही मागणी करू. राजकारण मराठा समाजाच्या आड होऊ नये एक लक्षात ठेवा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केले होते. उद्धवजी ठाकरे साहेबांना ते टिकवता आले नाही. मराठा समाजाला जेवढ्या काही सुविधा देण्यात आल्या आहेत त्या देवेंद्र साहेबांच्या नेतृत्वात देण्यात आल्या आहेत. कधी नव्हे ते अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ असेल, सारथीच्या माध्यमातून असेल, हॉस्टेलच्या माध्यमातून असेल, जेवढे काही आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीच दिले आहे. याच्या संदर्भात मराठा समाजाची कृतज्ञता आहेच, म्हणून आमचे म्हणणे आहे की राजकारण मराठा समाजाच्या आड होऊ नये, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. मराठा समाजासाठी आम्ही सदैव सोबत प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, आतापर्यंत तुम्हाला जरांगे चांगले वाटत होते. आता जरांगेंना तुम्ही म्हणता हा माणूस सर्वांना फसवतो आहे. जरांगे तुम्ही मराठ्यांना शेंड्या लावतात, खोकल्याचे औषध तुम्ही त्या ठिकाणी सांगता, तुमचे उपोषण नेमके काय? त्यामुळे या ठिकाणी आपण जरांगे यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही लगेच भूमिका बदलली, असा पलटवार दरेकर यांनी रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेवर केला. पुढे ते म्हणाले, मराठा समाजासाठी जर कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि उद्याही सोबत राहू, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, मराठा समाज या राज्यातला महत्त्वाचा समाज आहे. त्यांच्या मागण्या या पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी सर्वांसाठी हव्यात आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार प्रामाणिकपणे करत आहे. परंतु रामदास कदम यांनी या सगळ्या प्रकरणाची, जसे काही भाजपनेच केले आहे, अशा पद्धतीचे चित्र रंगावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, हे दुर्दैवी आहे.
Source link
'भाजपला दोष दिल्यास खपवून घेणार नाही':रामदास कदमांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार; भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी