![]()
भीमाशंकरच्या जंगलात जलविद्युत प्रकल्पाकरिता होत असलेल्या वृक्षतोडीमुळे व त्यामुळे विस्थापित होणाऱ्या वन्यजीवांमुळे नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर भीमाशंकर अभयारण्यात अधिवास असलेला महाराष्ट्राचा राज्य प्राणी व हरित मानचिन्ह असलेला शेकरू हा वन्यजीव व त्याचे नैसर्गिक जंगल वाचवण्याचा संदेश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सिल्लोड येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. पर्यावरण संवर्धक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह डॉ. संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जमिनीवर शेकरू या वन्यजीवाची भव्य रांगोळी रेखाटून तिच्याभोवती मानवी साखळी उभारली. वन्यजीव व जंगल वाचवण्याची चळवळ शालेय स्तरावर पोहोचली आहे, असा संदेश संपूर्ण राज्यात सर्वप्रथम सिल्लोडच्या या शाळेने दिला आहे. या प्रसंगी डॉ. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना जंगलाचा शेतकरी असलेल्या शेकरूचे निसर्गातील अमूल्य योगदान पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका वंदना दिवेकर यांच्या मदतीने संगीता वाकळे, काकासाहेब वाडेकर, गणेश व्यवहारे, विश्वनाथ लूटे, गोकुळ सिनकर, साहेबराव लाटे आणि सुनील दुसाने या शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. जंगलातील अनेक झाडांची फळे शेकरू खातो आणि आपल्या विष्ठेवाटे किंवा अर्धवट खाल्लेली फळे खाली पाडून नैसर्गिक बीजप्रसार करतो, ज्यातून नवीन वृक्ष उगवून जंगल समृद्ध होते. भविष्यात खाण्यासाठी काही फळे व बिया हा प्राणी मातीत पुरून ठेवतो आणि कालांतराने विसरून जातो; पाऊस पडताच त्यातून पुन्हा वृक्ष वाढीस लागतात. त्यामुळे जंगल निर्माण करण्यात या प्राण्याचा अतुलनीय वाटा असून, त्याला जंगलाच्या आरोग्याचा बायो इंडिकेटर मानले जाते. विद्यार्थ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळीतून संदेश दिला आहे. गुजरातमधील शेकरूची प्रजाती नामशेष झाल्याची आययूसीएनच्या यादीमध्ये नोंद शेकरूची एक उपप्रजाती गुजरातमध्ये आढळायची. या प्रजातीस रुटुफा इंडिका डीलबाटा म्हणजेच गुजराती भाषेत मोटी खिरकोली असे म्हणतात. राखी-करड्या रंगाची ही खारीची प्रजाती केवळ अधिवास नष्ट झाल्यामुळे गुजरातच्या वन्यजीवनातून पूर्णपणे नामशेष झाली. १९४० मध्ये ती शेवटची दिसली होती. १९८६ व १९९३ मध्ये व्यापक सर्वेक्षण करूनही ही प्रजाती आढळली नाही आणि आय.यू.सी.एन.च्या यादीत नामशेष म्हणून नोंदवली गेली. त्यामुळे आमचे मानचिन्ह व त्याचे जंगल शेष राहू द्या, अशी आर्त साद या उपक्रमाद्वारे घालण्यात आली.
Source link
भीमाशंकरचे जंगल वाचवा; सिल्लोडच्या विद्यार्थ्यांचा मानवी साखळीमधून संदेश:शाळेतील मैदानावर रेखाटले शेकरू वन्यजीवाचे चित्र