Headlines

भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले:दर्शनासाठी पास अनिवार्य; जिल्हा प्रशासनाची माहिती




भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दररोज एक हजार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास अनिवार्य असून, जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. भाविकांना मंदिर व्यवस्थापन समितीच्या https://shreebhimashankar.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून पास मिळवता येईल. नोंदणीकृत भाविकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध होईल. दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. भाविकांना ३० जून २०२६ पर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शन घेता येणार आहे. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप आणि पायऱ्यांचे काम सुरू असल्याने देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या बंद कालावधीस ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण होण्यास सामान्यतः सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. मात्र, भीमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरू ठेवल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास आले आहे. मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून, दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामेही पूर्ण झाली आहेत. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून, उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करून बांधकाम साहित्य, दगड आणि यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *