Headlines

भोंदू अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी:गुंगीच्या औषधांवरून कोर्टात जोरदार युक्तिवाद; त्या औषधाचे गूढ वाढलं




नाशिकमधील भोंदूगिरी आणि महिलांच्या शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला पुन्हा 18 एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले होते. मात्र सुनावणीच्या सुरुवातीलाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. न्यायालयाचा आवाज खरातपर्यंत पोहोचत नसल्याने काही वेळ सुनावणी थांबवावी लागली. नंतर अडथळा दूर झाल्यावर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खरातने पोलिसांकडून कोणतीही मारहाण झालेली नसल्याचे स्पष्ट केले. सरकारी पक्षाचे वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या कारवायांचा तपशील मांडला. त्यांच्या मते, खरात स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगून महिलांना आपल्या प्रभावाखाली आणत होता. तो महिलांना तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढे देत असे, ज्यामध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळले जात असल्याचा संशय आहे. या माध्यमातून महिलांवर मानसिक प्रभाव टाकून त्यांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सरकारी वकिलांनी पुढे सांगितले की, या गुन्ह्यामध्ये वापरलेले औषध नेमके काय होते, तसेच आरोपीने कोणत्या प्रकारच्या वस्तू किंवा रत्नांचा वापर करून ही भोंदूगिरी केली, याचा शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी सखोल चौकशीसाठी अतिरिक्त कोठडीची गरज असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. या मुद्द्यांवरून तपासाचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या बाजूने ॲड. सचिन भाटे यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. त्यांनी युक्तिवाद केला की, यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी अशाच प्रकारे कोठडी मागितली होती आणि आवश्यक तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुन्हा कोठडी देण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र सरकारी पक्षाने हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असल्याचे सांगत अधिक तपासाची गरज अधोरेखित केली. खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरत खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. या कालावधीत तपास यंत्रणा आरोपीच्या कार्यपद्धतीबाबत आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी खरातविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *