![]()
भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून, मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील फिर्यादी शेतकरी दिलीप अजिनाथ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 पासून सुरू असलेल्या मुतखड्याच्या त्रासावर वैद्यकीय उपचारांनी आराम न मिळाल्याने त्यांनी 20 जानेवारी 2026 रोजी मनोहर भोसलेच्या मठात धाव घेतली होती. मात्र तिथे आजार बरा करण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे. मठात प्रवेश केल्यानंतर मनोहर भोसलेची भेट घडवून आणण्यासाठी सेवेकऱ्यांनी राऊत यांच्याकडून 11 हजार रुपये उकळले आणि त्याची कोणतीही पावती दिली नाही. या भेटीत भोसलेने आजार पूर्णपणे बरा होईल असे सांगून त्यांना एक लाल रंगाची पावडर दिली. सुरुवातीला काहीसा आराम वाटल्याने राऊत पुन्हा मठात गेले असता, त्यांच्याकडे 80 हजार रुपयांची अवास्तव मागणी करण्यात आली, ज्यापैकी आर्थिक ओढाताण असल्याने त्यांनी 30 हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. काही दिवसांनी शारीरिक त्रास पुन्हा वाढल्यामुळे राऊत यांनी विचारणा केली असता, ‘तुमच्यावर करणी करण्यात आली आहे,’ असे सांगून मनोहर भोसलेने त्यांना मंत्रोच्चार केलेली पावडर देऊन दिशाभूल केली. मात्र औषधाचा कोणताही गुण येत नसल्याचे लक्षात आल्यावर राऊत यांनी एप्रिल 2026 मध्ये आपले पैसे परत मागितले असता, भोसलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार देत त्यांना मठातून हाकलून लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. 6 मे 2026 रोजी शिवाजी शहाजी वाघमारे आणि अप्पा शिवाजी जाधव यांनी फिर्यादी दिलीप राऊत यांच्या घरी जाऊन त्यांना पोलिसांत तक्रार न करण्यासाठी धमकावल्याचा आरोप आहे. पोलिसांकडे जाऊ नका, तुमचे पैसे परत करतो, असे सांगून त्यांनी राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र या दबावाला न जुमानता राऊत यांनी करमाळा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून मनोहर भोसले, शिवाजी वाघमारे, अप्पा जाधव आणि एका अज्ञातासह चौघांविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा 2013 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून, पोलिस आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
Source link
भोंदू मनोहर भोसलेच्या पापाचा घडा भरला!:शेतकऱ्याला 41 हजारांना लुटले, फसवणूक केल्याप्रकरणी करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल