![]()
मतदार यादी दुरुस्तीच्या (एसआयआर) बतावणीने सायबर चोरट्यांनी हडपसर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसर परिसरात राहायला आहेत. १५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर निवडणूक आयोगाच्या नावे बनावट संदेश पाठविला. तक्रारदाराच्या वडिलांचे नाव मतदार यादीत जुळत नसल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. बँक खात्याची गोपनीय माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून नऊ लाख ९२ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत. परदेशातील कंपनीच्या नावे फसवणूक जर्मनीतील एका कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एकाची आठ लाख ९२हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. तक्रादार हे व्यावसाियक आहेत. जर्मनीतील एका कंपनीतील कर्मचारी असल्याची बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. चोरट्याने त्यांना ईमेल पाठविला. कंपनी व्यवहारातील रक्कमेबाबत बतावणी करुन त्यांना तातडीने ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. चोरट्याच्या खात्यात त्यांनी पैसे पाठविले. पोलीस निरीक्षक इश्वर चव्हाण तपास करत आहेत. मतदार नोंदणीचे कर्तव्य न बजाविल्याने अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर कामावर गैरहजर राहिल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वाघोलीचे ग्राम महसूल अधिकारी गोकुळ भगत यांनी फिर्याद वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिला शुभांगी पवार यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता महिलेची मतदान केंद्र ३४० ते ३४९ साठी अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती केल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, त्यांनी या नोटिशीला उत्तर दिले नाही. शासकीय आदेशानुसार सोपविण्यात आलेले राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम ३२ अन्वये कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.
Source link
मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने ज्येष्ठाला 10 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांनी निवडणूक आयोगाच्या नावाने पाठवला बनावट संदेश; गुन्हा दाखल