![]()
पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना ‘समान काम, समान वेतन’ हा कायदेशीर हक्क मिळालाच पाहिजे, असा निर्धार कामगार नेते आणि पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मनपा प्रशासनाने या न्याय्य हक्काची अंमलबजावणी न केल्यास संघटितपणे निर्णायक लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा निर्धार मेळावा राष्ट्रीय मजदूर संघ कार्यालय, काँग्रेस भवन, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुरक्षा रक्षक, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, अतिक्रमण, घनकचरा, वाहनचालक आणि आरोग्य कोठी यांसारख्या विविध विभागांमधील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना नगरसेवक सुनील शिंदे म्हणाले की, कंत्राटी कामगार मनपाच्या विविध विभागांमध्ये नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच जबाबदारीची आणि महत्त्वाची कामे करत आहेत. त्यामुळे समान स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन मिळणे हा त्यांचा न्याय्य आणि कायदेशीर हक्क आहे. हा हक्क मिळवण्यासाठी कामगारांनी एकजूट कायम ठेवून संघटितपणे संघर्ष केला पाहिजे. शिंदे यांनी मनपा प्रशासनाला कामगारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून समान कामाला समान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मेळाव्यात कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. ‘कष्टकरी कामगार एकजुटीचा विजय असो!’, ‘समान कामाला समान वेतन मिळालेच पाहिजे!’ आणि ‘कंत्राटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मेळाव्याच्या सुरुवातीला, पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत अध्यक्ष सुनील शिंदे यांनी कंत्राटी कामगारांच्या समान कामाला समान वेतन, त्यांचे हक्क आणि अधिकार यावर केलेल्या परखड मांडणीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. अतिक्रमण विभागाचे गणेश बिडकर, पाणीपुरवठा विभागाचे गणेश साळुंखे, घनकचरा विभागाचे विनोद निकाळजे, संदीप शेलार, मोहन गायकवाड, विशाल गाडे, सुरक्षा रक्षक प्रतिनिधी सरिता धुळेकर, उज्वल साने, जान्हवी दिघे तसेच पुणे परिवहन मंडळाचे सचिन कसबे यांनी कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. या मेळाव्यास पुणे महानगरपालिकेतील निवृत्त पेन्शन कर्मचारी, पीएमपीएमएल आणि महामेट्रोमधील कंत्राटी कर्मचारी देखील उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Source link
मनपा कंत्राटी कामगारांना समान काम, समान वेतन मिळणार:कामगार नेते सुनील शिंदे यांचा कायदेशीर हक्कासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार