![]()
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी भाजपवर केलेल्या ‘धमकी व ऑफर’च्या दाव्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगेंना पाठवला जात आहे, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, अभिजीत दीपके यांनी हवेत गोळ्या मारण्याऐवजी धमकी देणाऱ्याचे नाव जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. अभिजीत दीपकेंनी संशय निर्माण करण्यापेक्षा थेट नाव जाहीर करावे दिल्लीतील आंदोलन संपवून घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी ‘आंदोलनाच्या सुरुवातीला भाजपकडून धमक्या आणि पक्षात येण्याची ऑफर आल्याचा’ आरोप केला होता. यावर विखे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. “अभिजीत दीपके यांचे वक्तव्य मी पाहिले. संशय निर्माण करण्यापेक्षा त्यांनी थेट समोर येऊन सांगावे की त्यांना कोणी धमकी दिली आणि कोणी ऑफर दिली? विनाकारण भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.” “दीपके यांनी चांगले आंदोलन केले आणि सरकारनेही त्याची दखल घेऊन लोकसभेत कठोर कायदा (अँटी पेपर लीक विधेयक) मंजूर केला. मात्र, जनाधार गमावलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे नसून, ते या आंदोलनाच्या आडून केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत. दीपके यांनी अशा राजकीय लोकांच्या आहारी पडू नये,” असा सल्लाही त्यांनी दिला. मनोज जरांगेंना विस्तृत अहवाल पाठवणार, आंदोलनाची वेळ येणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी ‘एकतर मी राहीन किंवा सरकार राहील’ असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, “कोणताही शासन निर्णय झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेत त्याच्या अंमलबजावणीला थोडा वेळ लागतो. सरकारने घेतलेले निर्णय, सुरू असलेली कार्यवाही आणि ती पूर्ण होण्याची निश्चित वेळ याचा एक विस्तृत अहवाल आम्ही मनोज जरांगे यांना पाठवत आहोत. हा अहवाल पाहिल्यानंतर आणि मी स्वतः भेटून चर्चा केल्यानंतर त्यांचे नक्कीच समाधान होईल.” “हैदराबाद गॅजेट आणि जुन्या 58 लाख कुणबी नोंदी वाचण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पर्शियन व मोडी लिपी वाचणाऱ्या 25 तज्ज्ञांची कायमस्वरूपी मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन आणि एसओपी लागू केली आहे.” फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर झालाय “मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीच ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. जरांगे पाटील यांच्या मनात फडणवीसांबद्दल काही गैरसमज झाले होते, मात्र माझी त्यांच्याशी चर्चा झाली असून तो बऱ्यापैकी दूर झाला आहे. ज्यांनी मागण्या मान्य केल्या, त्यांच्याबद्दल सकारात्मक बोलले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सांगली-कोल्हापूर पूरनियंत्रणासाठी ‘हिप्परगी बॅरेज’वर बारकाईने लक्ष कोल्हापूर आणि सांगलीतील संभाव्य पूरस्थितीबाबत बोलताना त्यांनी सरकार पूर्णपणे सतर्क असल्याचे सांगितले. “गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पुराचे नियंत्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कर्नाटक सरकारशी रोज संवाद साधला जात आहे. विशेषतः हिप्परगी बॅरेजच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता नेमण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही, याचे पूर्ण नियोजन सरकारने केले आहे.” राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले, “लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीची भाषा आणि शब्दांचा वापर केला, तो संसदीय संकेतांना धरून नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि हक्कभंगाची मागणी योग्यच आहे.” हेही वाचा… सहकार मंत्र्यांच्याच जिल्ह्यात सावकारांचा सुळसुळाट, पण खात्याला माहितीच नाही!:अवैध सावकारकीसह मायक्रो फायनान्सवरून बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल “अवैध सावकारकी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब व शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली आहे. अनेक जण जामीनदार झाले म्हणून कोट्यवधींच्या जमिनी सावकारांनी बळकावल्या आहेत. हा प्रकार एकाच जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू असूनही खात्याला किंवा मंत्र्यांना याची साधी माहितीच नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. खासगी सावकारी प्रकरणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महसूल व पोलीस प्रशासनाला आणि सहकार मंत्र्यांना थेट इशारा दिला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मनोज जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही:राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही, फडणवीसांबाबतचा गैरसमज दूर झाल्याचाही दावा