Headlines

मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.7 रिश्टरचा भूकंप:सकाळीच पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे तीव्र धक्के, नांदेड-परभणीतही जाणवले कंप




मराठवाडा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. भूकंप हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ परिसरात झाल्याची माहिती सर्वप्रथम समोर आली. मात्र, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे प्राथमिक निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. या भागात काही सेकंद जमीन हलल्याची जाणीव नागरिकांना झाली. या भूकंपाची नोंद लातूर येथील भूकंप मापन केंद्रावर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील भूकंपीय हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ या घटनेची माहिती संकलित केली. अधिकृत आकडेवारीनुसार, भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी काही ठिकाणी कंप स्पष्टपणे जाणवले. हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. अनेक नागरिकांनी घरातील वस्तू हलल्याचे सांगितले. काही ठिकाणी लोक घाबरून घराबाहेर धावले, मात्र सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये, शांत राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, मराठवाडा हा भूकंपप्रवण पट्टा मानला जात असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळाव्यात, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. 1993 सालच्या किल्लारी भूकंपाची आठवण 1993 सालचा किल्लारी भूकंप हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींमध्ये गणला जातो. 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे साधारण 3 वाजून 56 मिनिटांनी हा भूकंप झाला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर सुमारे 6.3 इतकी नोंदवली गेली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावाजवळ होता, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागांनाही याचा मोठा फटका बसला. या भूकंपात हजारो लोकांचा जीव गेला आणि अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अधिकृत आकडेवारीनुसार सुमारे 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो जखमी झाले. किल्लारी, उस्मानाबाद, लातूर परिसरातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक कच्ची घरे आणि दगडी बांधकामे क्षणार्धात कोसळली, त्यामुळे लोकांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. हा भूकंप रात्रीच्या वेळी झाल्याने लोक गाढ झोपेत होते, त्यामुळे नुकसान अधिक झाले. अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. गावागावात भीषण हाहाकार माजला होता. रस्ते, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था यांचे मोठे नुकसान झाले. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र नंतर शासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *