![]()
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून, विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या ऐनवेळी होत असलेल्या गाठीभेटींमुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे. एका बाजूला कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची अचानक भेट घेतली, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात निरनिराळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची हॉटेल ‘सयाजी’ येथे विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. ठाकरे गटाचे सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मंत्री सामंत यांची स्वतंत्र भेट घेऊन चर्चा केली. याशिवाय काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, भाजप आमदार अमोल महाडिक, आमदार विवेक कोल्हे आणि बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनीही उदय सामंत यांची भेट घेतली. एकाच वेळी तीन ते चार वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांचे नेते एकत्र आल्याचे पाहून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. शरद पवारांना ‘दौलत’ ग्रंथाची भेट दुसरीकडे मुंबईत मंत्री शंभूराज देसाई यांनी शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असून, या वेळी देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनप्रवासावर आधारित “दौलत” हे पुस्तक शरद पवार यांना भेट दिले. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली, याविषयी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय गणितांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
Source link
कोल्हापुरात नार्वेकर-सामंत तर मुंबईत शंभूराज देसाई-शरद पवार भेट:महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नक्की काय शिजतंय? चर्चांना उधाण