![]()
शहरातील के.आर.टी. हायस्कूलच्या पाठीमागील पुणेगाव डाव्या कालव्यात बुधवारी (दि. ६) दुपारी कथितपणे मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवाहू वाहनातून (एमएच १५ जीव्ही २८०९) एका कंपनीचे कथित मुदतबाह्य कुरकुरे, पापडी व मुगदाळची पाकिटे कालव्यात फेकण्यात आल्याचा आरोप होत असून, पिण्याच्या पाण्याच्या स्रोताशी हा गंभीर प्रकार जोडला गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित कालवा वणी शहरासह येवल्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असून, त्याच पाण्यावर शेकडो एकर शेतीचे सिंचनही अवलंबून आहे. त्यामुळे कालव्यात कथितपणे खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावल्याचा प्रकार पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये संबंधित वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात असून, त्या आधारे वाहनमालक, चालक तसेच संबंधित विक्रेता अथवा एजन्सीचा शोध घेऊन चौकशीची मागणी होत आहे. नियमांनुसार कालवा, नदी किंवा सार्वजनिक जलस्रोतामध्ये कचरा अथवा मुदतबाह्य वस्तू टाकणे गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चौकशीचे आश्वासन ^या घटनेची माहिती मिळाली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्ती अथवा संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. – भूषण दंडगव्हाण, शाखा अधिकारी, पुणेगाव धरण
Source link
वणीतील पुणेगाव डाव्या कालव्यात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विल्हेवाट:वाहनातून पाकिटे फेकल्याचा स्थानिकांचा आरोप; चौकशीची मागणी