![]()
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी कृतीशील दृष्टिकोन निर्माण करणारे उपक्रम ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य व्ही. डी. कापसे यांनी केले. राजूरा येथील माध्यमिक विद्यालय व खंडेराव देशमुख उच्च माध्यमिक विद्यालयाने अकरावीच्या प्रवेशोत्सवानिमित्त “वृक्षारोपणाचा संकल्प – शिक्षणाचा शुभारंभ’ या संकल्पनेतून वृक्ष लावा… प्रवेश मिळवा! हा अभिनव उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. डी. कापसे होते. तर कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. नितीन टाले यांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रा. टाले यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले, वृक्ष लावणे ही सुरुवात आहे; वृक्ष जगवणे ही खरी जबाबदारी आहे. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे हेच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यावेळी प्रवेश निश्चित करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यालयाच्या वतीने एक वृक्ष भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांनी वृक्षासोबत ग्रीन सेल्फी घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची हरित सुरुवात केली. त्यानंतर प्रत्यक्ष वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन व पर्यावरण संवर्धनाची आजीवन जबाबदारी स्वीकारण्याची शपथ घेतली. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी लावलेला वृक्ष केवळ लावायचा नसून तो संपूर्ण शैक्षणिक वर्षभर जतन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वर्षअखेरीस त्या वृक्षासोबतचा सेल्फी सादर करावा लागणार असून, पुढील वर्षीही वृक्षाच्या वाढीचा पुरावा म्हणून पुन्हा सेल्फी सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, इयत्ता अकरावी व बारावीच्या पर्यावरण शिक्षण विषयाच्या प्रात्यक्षिक मूल्यमापनाशी हा उपक्रम जोडण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची कृतीशील जाणीव आणि जबाबदारी अधिक दृढ होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशिष बोरकर यांनी केले, तर प्रा. शारदा हिवरे यांनी आभार मानले. प्रा. वैशाली पतंगे, प्रा. बनकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल “ग्रीन सेल्फी-ग्रीन कॅम्पस-ग्रीन फ्युचर’ आणि “एक विद्यार्थी – एक वृक्ष’ या संकल्पनांवर आधारित हा उपक्रम केवळ प्रवेशोत्सवापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संरक्षणाची व्यापक लोकचळवळ बनण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण संवर्धनाची प्रत्यक्ष कृती घडवून आणणारा हा प्रयोग राज्यासह देशभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अनुकरणीय ठरण्याची क्षमता बाळगतो.
Source link
एक रोप, एक सेल्फी अन् आजीवन शपथ; विद्यालयात हरित प्रवेशोत्सव:कृतीशील दृष्टिकोन निर्माण करणारे उपक्रम गरजेचे : कापसे