Headlines

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला!:भरत गोगावलेंच्या नावावर शिक्कामोर्तब, विधान परिषद निवडणुकीतच निर्णय- आमदार महेंद्र थोरवे




रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला तिढा सुटल्याचा दावा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यानच महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून शिवसेना नेते भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या निर्णयाला दुजोरा दिल्याची माहिती थोरवे यांनी दिली. आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर एकत्र येत भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. महायुतीतील सर्व मतभेद बाजूला सारून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही घटक पक्षांचे नेते एकत्रितपणे या निर्णयाची घोषणा करतील. त्यामुळे येत्या दोन दिवसांतच रायगडच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. सर्व काही निश्चित, फक्त घोषणेची औपचारिकता- भरत गोगावले माणगाव येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनीही या संदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले. पालकमंत्रीपदाबाबत सर्व काही निश्चित झाले असून, आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, असे सांगत गोगावले यांनी वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास हेच मुख्य ध्येय- आदिती तटकरे दुसऱ्या बाजूला, मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच यावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल. भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच असतील. आमच्यासाठी पालकमंत्रिपदापेक्षा रायगड जिल्ह्याचा विकास अधिक महत्त्वाचा आहे, असे वक्तव्य तटकरे यांनी केले होते. जिल्ह्यात सध्या दोन मंत्री कार्यरत असून, दोघांच्या माध्यमातून जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *