![]()
पुण्यात खराडी येथे मसाज पार्लर चालकाकडून देहविक्रयाचा आरोप करत खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी पीडित महिलेकडून ३० हजार रुपये घेतले होते. या प्रकरणी प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. येरवडा), विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा), छाया सुखदेव कांबळे (वय ४०, रा. येरवडा) आणि सुनीता संजय लोंढे (वय ४३, रा. वडगावशेरी) यांना अटक करण्यात आली आहे. खराडी पोलीस ठाण्यात एका महिलेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मसाज पार्लरमध्ये देहविक्रय सुरू असल्याचा आरोप करत पीडित महिलेला धमकावले. पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत त्यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. यावेळी एका आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला मारहाणही केली. नंतर तडजोडीत दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पीडित महिलेने आरोपींना ३० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी पोलिसांकडे तक्रार करणार नाही आणि कारवाई होऊ नये यासाठी मध्यस्थी करू असे सांगितले. गुरुवारी (१४ मे) आरोपींनी उर्वरित रक्कम घेण्यासाठी महिलेला कोरेगाव पार्क परिसरात बोलावले होते. यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीनुसार, खंडणी, धमकी आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, उपनिरीक्षक बिडवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेली आरोपी छाया कांबळे ही सामाजिक कार्यकर्ती म्हणून वावरत होती, तर सुनीता लोंढे सुरक्षाक्षक म्हणून काम करते. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Source link
मसाज पार्लरमध्ये देहविक्रयाचा आरोप:खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह पाच जणांना अटक